निवडणूक आयोगाचं ठरलं! सात टप्प्यांमध्ये होणार निवडणूक

19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक, 4 जूनला लागणार निकाल
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर घोषित झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्ती राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. तसेच त्यांनी यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने काही नियमही सांगितले. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी द्वेष निर्माण करणारी भाषणं किंवा विधाने करू नये, फेक न्यूज पसरवू नयेत, नाहीतर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजीव कुमार यांनी दिला आहे. 543 जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी, दुसरा टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे रोजी, चौथा टप्पा 13 मे रोजी, पाचवा टप्पा 20 मे रोजी सहावा टप्पा 25 मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात यामध्ये आणखी राज्यं जोडली जाणार. 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. या माहितीत त्यांनी नवमतदार किती आहेत, वृद्ध मतदार किती आहेत, तरुण मतदार किती आहेत, महिला आणि पुरुष मतदार किती आहेत, याची सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसरी टर्मही आमचीच असल्याचा दावा केला आहे. तर राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने तिसऱ्यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं म्हटलं आहे. निवडणूक आयोग आता किती टप्प्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करतात आणि निकालाची तारीख काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आमच्या समोर निवडणुकीत मनी आणि मसल पॉवर रोखण्याचं आव्हान आहे. पण आम्ही हे आव्हान पार पाडणार आहोत. मसल आणि मनी पॉवरचा निवडणुकीत वापर करणाऱ्यांवर आम्ही कठोर करावाई करू. निवडणुकीतील पैशाचा गैरवापर रोखण्यावर आमचा भर असणार आहे. निवडणुकीत कोणत्याही गैरव्यवहारावराला थारा राहणार नाही, अशी माहिती देतानाच खोट्या बातम्यांमागची सत्यताही तपासणार आहोत, त्यासाठी वेबसाईट तयार करणार आहोत, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

दोनदा मतदान नकोच
निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करणअयाचा इशारा त्यांनी दिला आहे. उमेदवारांची त्यांचा प्रचार जरूर करावा. पण कुणावरही वैयक्तिक टीका करू नका. राजकीय पक्षांनीही द्वेष निर्माण करणारे भाषण करू नयेत. विधाने करू नयेत. निवडणूक नियमांचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्या, असं आवाहन राजीव कुमार यांनी केलं आहे.

फेक न्यूज तपासल्या जाणार
निवडणूक आयोगाने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. फेक न्यूज देणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. आयोग सत्य आणि असत्य याची माहिती देणरा आहे, अशी माहिती देतानाच निवडणुकीत विमानं आणि हेलिकॉप्टरमधून आलेल्या वस्तुंची तपासणी केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

घरीच मतदान करता येणार
देशात 85 लाखाहून अधिक वयोवृद्ध मतदार आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेणार आहोत. देशात पहिल्यांदाच असं होणार आहे. 85 वर्षाहून अधिक वयाचे मतदार आणि 40 टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात येईल आणि त्यांना घरीच मतदान करायला सांगितलं जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

निवडणुकीत साड्या, पैेसे, मद्य यांचं वाटप केल्यास कारवाई
निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

लोकसभा निवडणूक सात टप्प्यामध्ये पार पडणार
महत्त्वाच्या राज्यांमध्ये पोटनिवडणुका होणं बाकी आहे. बिहार, गुजरात, हरयाणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुका आत्ता जाहीर करणार आहोत.

आरोपांचा आणि भाषेचा स्तर घसरतो आहे, स्टार कँपनेर्सनाही नोटीस
आरोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता याची गंभीर दखल घेण्यात आली असून स्टार कँपेनर्सना देखील नोटीस देण्यात येणार आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

पैसे वाटप सुरु असल्यास 100 मिनिटांत पथक पोहचणार
कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील ॲप वर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटात आमची टीम तिथे पोचतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.

मनी, मसल पॉवर, अफवा रोखण्याचं आमच्यासमोर मोठं आव्हान
आमच्यासमोर निवडणुकीची तयारी करताना एकूण चार आव्हानं होती. यामध्ये मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आमच्यासमोर होतं. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर मतदारांना हवी असणारी सगळी माहिती
निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपं होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या ॲपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. हिंसाचार रोखण्यासाठीही आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. कुठल्याही प्रकारे हिंसा होऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत.

Exit mobile version