…होऊ दे खर्च; निवडणूक विभागाने निश्‍चित केले वाहनांचे दर

जीपचे भाडे चार हजार, बैलगाडीला मात्र कवडीमोलाची किंमत


| रायगड । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी खर्चाची मर्यादा 28 लाखांवरून 40 लाख करण्यात आली आहे. म्हणजेच 12 लाखांची वाढ करण्यात आली आहे. सभा, रॅली, जाहिराती यासारख्या प्रचाराच्या विविध माध्यमांवर उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो.

मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. कोणत्या वाहनाचे दर दिवशीचे किती रूपये भाडे राहील, हे निवडणूक विभागाने निश्‍चित केले आहे. त्यानुसार टाटा सुमो, बोलोरो, काळी-पिवळी, जीप यांचे इंधनासह दिवसाचे भाडे 3 हजार 800 रूपये तर बैलगाडी, घोडागाडीचा प्रति तास दर 2 रूपये ठरविण्यात आला आहे.

निवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार करावा लागतो. यासाठी वाहने भाड्याने घेऊन त्यावर ध्वनीक्षेपक लावला जातो. तसेच बॅनर, पोस्टर तसेच वाहनाला बॅनर, पोस्टर बांधून उमेदवार प्रचार करतात. निवडणुकीदरम्यान, खर्चाची मर्यादा पाळणे उमेदवाराला आवश्यक आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत 40 लाख रूपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. दर दिवशीचा खर्च उमेदवाराला निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास तो उमेदवार निवडून येऊनही त्याचे पद धोक्यात येण्याची शक्यता असते. कोणत्या वाहनासाठी किती रूपये दर राहणार आहे, हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक विभागाला आहे. संबंधित उमेदवाराने त्या वाहनधारकाला किती रूपये दिले तरी निवडणूक विभागाकडे खर्च सादर करतेवेळी निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या दरानेच खर्च सादर करावा लागतो. त्यानुसार निवडणूक विभागाने वाहनांचे दर ठरवले आहेत.

निवडणूक खर्चाचा हिशेब जुळवतेवेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांचे दर ठरवले आहेत. सोबतच इंधनासह व इंधनाशिवाय असेसुद्धा वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसारच निवडणूक खर्च विभागाला सादर करणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो. निवडणूक विभागाने इंधनासह ऑटोरिक्षाचा दर प्रति दिवस 1 हजार रूपये, सायकल रिक्षा प्रति तास 2 रूपये, बैलगाडी, घोडागाडी, सायकल प्रति तास 2 रूपये, दुचाकी प्रति तास 20 रूपये, ट्रॉलिसोबत ट्रॅक्टर प्रति दिवस 3 हजार रूपये दर ठरविला आहे. 40 सिटर प्रवाशी वाहनाचे इंधनाशिवाय दिवसाचे भाडे 7 हजार 700 रूपये तर इंधनासह 10 हजार 400 रूपये दर ठरवला आहे. 18 सिटर वाहनाचे दिवसाचे इंधनाशिवाय भाडे 4 हजार 625 तर इंधनासोबतचे भाडे 5 हजार 760 रूपये ठरविले आहे. 50 सिटर वाहनाचे इंधनासोबतचे भाडे 12 हजार 150 रूपये ठरविण्यात आले आहेत.मालवाहू वाहनासाठी पाच हजार रूपये मालवाहू हलक्या वाहनाचे इंधनासह भाडे 5 हजार 260 रूपये ठरविले आहे. 10 चाकी वाहन असल्यास 12 हजार 800 रूपये, 12 ते 14 चाकी वाहन 13 हजार 600 रुपये, 16 चाकी वाहनाचे भाडे 15 हजार 700 रूपये ठरविले आहे. त्यानुसार निवडणूक खर्च सादर करावा लागेल.
काही उमेदवार शहरात सायकल रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करतात. त्यासाठी इंधन लागत नाही. त्यामुळे भाडे कमीच राहिल. मात्र निवडणूक विभागाने सायकल रिक्षा, घोडागाडी, बैलगाडी, सायकल यासाठी प्रति तास केवळ दोन रूपये भाडे ठरविले आहे. 400 रुपये दिवसाची मजुरी दिल्याशिवाय मजूर मिळत नाही, अशास्थितीत सायकल, सायकल रिक्षा, बैलगाडी केवळ दोन रूपये प्रति तास या दराने मिळणार काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

जेवणाचे दर
व्हेज थाळी स्पेशल 180, नॉनव्हेज थाळी 240, बिर्याणी 150, पोहे 20, चहा 10, कॉफी 15, वडापाव 15, भजे प्लेट 20, पाणी बाटली 17, मिसळपाव 60, पाव भाजी 60, फुलांचा मोठा हार 80, गांधी टोपी 10, फेटा 190, ढोल-ताशा (प्रतिव्यक्ती) 500
Exit mobile version