मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमाला सुरुवात
। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पावसाळ्यानंतर लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागदेखील कामाला लागला आहे. रायगड जिल्ह्यात 25 जूनपासून मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, बैठकांसह प्रशिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 20 ऑगस्टपर्यंत द्वितीय संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्यात मतदार यादी द्वितीय संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उपविभागीय अधिकार्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे. पूर्व पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत 24 जुलैपर्यंत प्रत्येक मतदारांच्या घरोघरी मतदार यादीत नावनोंदणी, नावाबाबत पडताळणी करणे, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राचे प्रमाणिकरण व सुसूत्रीकरण करणे, मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या.
विशेष मतदार नाव नोंदणी शिबीर
मतदान यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष मतदार नाव नोंदणी शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मतदारांकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, आदी विविध प्रकारची कामे या कालावधीत केली जाणार आहेत.
20 ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध होणार
पुनर्रिक्षण कार्यक्रमात 25 जुलैला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 9 ऑगस्टपर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे म्हणजेच नाव नोंदणी व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 19 ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.