जिल्ह्यातील ‘या’ ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहिर; अलिबागमधील 6 ग्रा.पं.चा समावेश

64 ग्रामपंचायतींमधील 96 रिक्त जागा; 11 थेट सरपंचासाठी, तर 85 जागांसाठी निवडणूक

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

ऐन उन्हाळ्याच्या कडाक्याने आधीच गर्मी असताना, पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. निधन, राजीनामा अथव अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीमधील सदस्य पद रिक्त राहिलेल्या जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी होत आहे. 64 ग्रामपंचायतींमधील 96 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यात थेट सरपंचपदासाठी 11 व सदस्य पदासाठी 85 जागांची निवडणूक घेतली जाणार आहेत. 18 मे रोजी मतदान होणार असून, 19 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये 64 ग्रामपंचायतींमध्ये 96 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये 11 सरपंच व 85 सदस्य पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा शासनाकडून भरल्या न गेल्याने त्यांच्या विकासकामांवरही परिणाम झाला. पोटनिवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर जिल्ह्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणुकीसाठी 25 एप्रिलपासून 19 मेपर्यंत प्रशासकीय कामकाज चालणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी या वेळेत नामनिर्देशन अर्ज भरणे. 3 मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून प्राप्त अर्जांची छाननी होणे. 8 मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेणे. त्यानंतर दुपारी तीननंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप करणे. तसेच 18 मे रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान केंद्रामध्ये मतदान होणार आहे. 19 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, मतमोजणी व निकाल घोषित करण्याचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने तहसीलदार करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संपेपर्यंत या ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

अलिबागमधील या ग्रामपंचायतींचा समावेश

  1. कुरुळ
  2. परहूर
  3. रामराज
  4. शहापूर
  5. कोप्रोली
  6. नवेदर नवगाव
Exit mobile version