कर्मचार्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग पंचायत समितीच्या इमारतीमध्ये मागील काही महिन्यापुर्वी लिफ्टसाठी राखीव असलेल्या जागेत कचरा टाकण्यात आला होता. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन अनेक महिने उलटली असतानाच याच कार्यालयाच्या आवारात गवत व इतर कचर्याने विळखा घातला असून सांडपाण्याचे नियोजन नसल्याने त्याची दुर्गंधी पसरत आहे. कर्मचार्यांसह कामानिमित्त येणार्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलिबाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत अशी पंचायत समितीची दुमजली इमारत आहे. या इमारतीमध्ये पंचायत समितीचे कार्यालयात असून बांधकाम विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचार्यांसह कामामनिमित्त येणार्या नागरिकांची कायमच वर्दळ आहे. या कार्यालयामार्फत गावपातळीवर स्वच्छता राखण्याच्या सुचना कायमच दिल्या जात असतात. परंतु, दुसर्या शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी परिस्थीत अलिबाग पंचायत समितीची झाली आहे.
तसेच, तळ मजल्यावर असलेल्या वेगवेगळ्या कार्यालयांना गळती लागली आहे. तळमजल्यावर वरच्या मजल्यावरील स्वच्छता गृहाचे सांडपाणी भिंतीमधून गळत आहे. शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी व लेखापरिक्षण पथक कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाजूलाच सांडपाण्याचा वास प्रचंड येत आहे. त्याचठिकाणी प्लास्टिक बाटल्या व इतर कचरा व गवत तसेच काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. या कार्यालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असताना पंचायत समितीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे पंचायत समितीच्या अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष दयावे, अशी मागणी होत आहे.