ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन
| मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले या पाच अक्षरांची सात दशकांहून अधिक काळ चाललेली सप्तसुरांची मैफल आज विसावली. पिढ्यान् पिढ्यांवर आपल्या अलौकिक स्वरांची मोहिनी घालणारी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून देशभर प्रार्थना सुरू होत्या. मात्र, प्रार्थनांचेच बळ जणू कमी पडले आणि आशा भोसले यांच्या निधनाची बातमी थडकली. रविवारी (दि.12) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आणि उभा देश शोकसागरात बुडाला. उद्या सोमवारी (दि.13) मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी चारनंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आशा भोसले यांनी 1948 साली आशा भोसले यांनी चुनरिया चित्रपटाद्वारे पार्श्वगायक क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. त्यांनी 12 हजार हून अधिक गाणी गाण्याचा विक्रम नोंदवला आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताला वेगळ्या उंचीवर नेले. त्यांनी 7 दशकांहून अधिक काळ मराठी, हिंदीसह अनेक भाषांत हजारो गाणी गायली आहेत. आशा भोसले यांना 2008 साली पद्मविभूषण, 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार यांसारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांच्या अष्टपैलू गायकीने बॉलिवूडमध्ये महिला अभिव्यक्ती पुन्हा परिभाषित केली.
वयाच्या 9 व्या वर्षी वडील गमावले
आशा भोसले या प्रसिद्ध रंगभूमी अभिनेत्री आणि शास्त्रीय गायिका दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि सुरांची राणी लता मंगेशकर यांची धाकटी बहीण होत्या. त्या फक्त 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले, ज्यामुळे त्यांनी त्यांची बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गाणे सुरू केले. आशा यांची खासियत म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या गाण्याशी स्वतःला जुळवून घेतले. मग ती रोमँटिक गाणी असोत, कॅबरे गाणी असोत, गझल असोत किंवा शास्त्रीय संगीत असो. त्यांनी प्रत्येक शैलीत त्यांच्या आवाजाची अमिट छाप सोडली.
महाराष्ट्राचे भूषण आशा अन् लता मंगेशकर
संपूर्ण विश्वावर ज्या दोन बहिणींच्या आवाजाने जादू केली अशा दोन बहिणी म्हणजे आशा ताई भोसले आणि लता दीदी मंगेशकर. वयाच्या अगदी 10 व्या वर्षापासून त्यांच्या संगीतमय प्रवासाला सुरुवात झाली. दोन्ही बहिणींची शास्त्रीय संगीतावर विलक्षण पकड होती. आशा भोसले यांनी तब्बल 900 चित्रपटांमध्ये गाणी गायली. तर लता मंगेशकर यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने सर्वांना मोहित केले. आशाताई भोसले यांनी 12 हजारांहून अधिक गाणी गाऊन प्रत्येकाला थिरकायला लावले. त्यांच्या आवाजातील जादू तरुणाईला अक्षरशः धुंदावले. आशा भोसले यांचा चिरतरुण आवाज एक जोशपूर्ण वातावरण निर्माण करत असे. आशा भोसले आणि ओ.पी. नय्यर यांची जोडी प्रेक्षकांना भावली. 1960 ते 70 च्या दशकात आशा भोसले यांनी अभिनेत्री हेलन यांना आवाज देत बॉलीवुडवर राज्य केले. वयाच्या 90 व्या वर्षीदेखील तितकाच्या ताकदीने गायन करणाऱ्या आशा भोसले यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आशाताईंच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. त्यांनी आपल्या विलक्षण संगीत प्रवासाने भारताचा सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आणि जगभरातील असंख्य हृदयांना स्पर्श केला. आशाताईंसोबचे माझे संवाद मी नेहमीच जपून ठेवीन. त्यांचे संगीत अमर राहील. ही देशासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.
नरेंद्र मोदी,
पंतप्रधान
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणाऱ्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही ॠतू आणि भावभावनांचा सुरेल असा म्हणजे आशाताई.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री






