मतदान यंत्राच्या रिक्त स्मृतीची होणार पडताळणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
मागील 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्राच्या रिक्त स्मृतीची तपासणी व पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल निवडणूक विभागाने घेतली असून, येत्या 22 व 23 जुलैला पेणमधील जिल्हा मध्यवर्ती मतदान यंत्र अभिरक्षा गृहामध्ये होणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी दिली. मतदान होऊन सहा महिने उलटून गेले आहेत. त्याची कार्यवाही तातडीने करणे आवश्यक होते. त्यामुळे येत्या दोन दिवसात होणाऱ्या मतदान यंत्राच्या पडताळणी व तपासणीवर शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्रांतील मतदान यंत्रामधील रिक्त स्मृतीची पडताळणी व तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नोव्हेंबर 2024 मध्ये करण्यात आली होती. या तक्रारीची दखल तातडीने घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, मतमोजणीला सहा महिने होऊन गेले आहेत. या सहा महिन्यांमध्ये मतमोजणीची यंत्रे निवडणूक विभागाकडे असताना त्यांनी तक्रारीची तातडीने दखल का घेतली नाही, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. मतदान प्रक्रियेत मंगळवारी 22 जुलैला एक मतदान केंद्रावरील मतदान यंत्राच्या रिक्त स्मृतीची तपासणी होणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि. 23) तीन मतदान केंद्रावरील यंत्राच्या रिक्त स्मृतीची तपासणी व पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी पेण तालुक्यातील शितोळे येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती मतदान यंत्र अभिरक्षा गृह सकाळी नऊ वाजता उघडण्यात येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात यावेळेत रिक्त स्मृतीची तपासणी व पडताळणी केली जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी दिली.
मतदान यंत्रातील रिक्त स्मृतीची पडताळणी करण्यावर शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही उमेदवार व नागरिक याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती उपलब्ध होत आहे.