शिवकन्या गोविंदा पथकाचा उत्साह

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरातील एकमेव महिला गोविंदा पथक म्हणून ओळख असलेल्या शिवकन्या महिला गोविंदा पथकाने यंदाही छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. सुमारे 600 महिला सदस्यांचा सहभाग असलेल्या या पथकाने शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडी उत्सवाची परंपरा कायम राखली.

महिलांना दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्यांमधून काही काळ मुक्त होऊन मनमुराद आनंद घेता यावा, त्यांच्यातील कलागुणांना आणि उत्साहाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने शिवकन्या महिला गोविंदा पथकाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी या पथकाच्या माध्यमातून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो. यंदाच्या दहीहंडी उत्सवात विविध गाण्यांच्या ठेक्यावर महिलांनी ताल धरत जल्लोष केला. शिस्त, एकजूट आणि उत्साहाचे दर्शन घडवत महिला गोविंदांनी दहीहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. या उत्सवामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपश्री पोटफोडे, डॉ. नीता कदम, दीपिका शिगवण आणि जागृती जैन यांच्यासह महिला सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version