नांदगांव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळेवाडी येथील ग्रामस्थांची घरवापसी
। कर्जत । संजय गायकवाड ।
नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भोपळेवाडी येथील संपूर्ण गावाने दोन दिवसांपूर्वी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला होता, त्याच ग्रामस्थांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी विकासकामांचे आश्वासन देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
19 सप्टेंबर रोजी भोपळीवाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. प्रवेश करताना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांच्या वतीने खोटे आश्वासन व दिशाभूल करून पक्ष प्रवेश करुन घेण्यात आला होता, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. पक्षप्रवेश करतेवेळी आम्हीच गोरगरीब जनतेचे पाईक आहोत, असा आव आणून संपूर्ण गावाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असे दर्शविण्यात आले. मात्र दि. 20 सप्टेंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा भगव्या झेंड्याखाली घरवापसी केली असून भोपळीवाडी येथील राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
या प्रसंगी तालुका संघटक शिवराम बदे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, विभाग प्रमुख रवी ऐनकर, रवी फोपे, माजी सरपंच नागेश साबळे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी स्थानिक आमदार विकास निधी सन 2021-22 अंतर्गत भोपळेवाडी येथे सामाजिक सभागृह बांधण्याबाबतचे पत्र ग्रामस्थांकडे सुपूर्द केले.