पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष; देशी-विदेशी पर्यटकांतून नाराजी
| चिरनेर | प्रतिनिधी |
जागतिक कीर्तीच्या एलिफंटा लेण्यातील केव्हज नंबर तीनच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब पूर्णतः धोकादायक बनला आहे. त्यामुळे तो केव्हाही कोसळून मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, दुर्दैवाने भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाचे अधिकारी दुरुस्तीसाठी यावर्षी आर्थिक बजेट नसल्याचे सांगत आहेत.
मुंबईपासून 11 किमी अंतरावर असलेल्या जागतिक कीर्तीच्या घारापुरी लेण्या नेहमीच जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत आल्या आहेत. भव्य शिवलिंग, 21 फूट उंचीची भव्य दिव्य महेश मूर्ती, योगेश्वर शिव, रावणानुग्रह शिवमूर्ती, अर्धनारी नंटेश्वर, गंगाधर शिवमूर्ती, अंधकारसुर वधमूर्ती,नटराजशिव शिवाची अशी अनेक रुपे या अद्भुत लेण्यांतून मोठ्या खुबीने साकारली आहेत. काळ्या पाषाणात सहाव्या शतकातील अतिप्राचीन कोरलेल्या अप्रतिम लेण्यांमुळे एलिफंटा लेण्यांना वर्ल्ड हेरिटेजचा वारसा लाभला आहे. त्यामुळे एलिफंटा लेण्या आगळ्यावेगळ्या एकमेवाद्वितीय अशाच असल्याने वर्षभरात देशविदेशातील सुमारे 12 लाखांहून अधिक पर्यटक लेणी पाहण्यासाठी हजेरी लावतात.
या लेण्यांपैकी जागतिक वारसा लाभलेली लेणी क्रमांक-3 च्या प्रवेशद्वारावरील छत 1987 साली कोसळले होते. त्याची दुरुस्ती करुन लोखंडी सळ्यांचा आणि सिमेंट काँकिट वापर करून पूर्वीप्रमाणे हुबेहूब छत आणि स्तंभ उभारण्यात आले होते. मात्र, 37 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारावरील छताचा आडवा खांब आणि उभे स्तंभ दुरुस्तीअभावीख् तसेच या लेण्यातील प्रवेशद्वारावरील स्लॅब पर्यटकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. प्रवेशद्वारावरील भले मोठे 20-20 फूट उंचीचे अवाढव्य स्तंभांना मोठ मोठ्या तडा गेल्या आहेत. छतावरील लांबलचक लोखंडी सळ्या स्लॅबची पडझड होऊन आधीच स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. दुर्लक्षामुळे स्लॅब पडून बाहेर पडलेल्या लोखंडी सळ्या पुरत्या सडून गेलेल्या आहेत. त्यामुळे कमजोर झालेले प्रवेशद्वारावरील स्लॅब आणि स्तंभ धोकादायक बनले आहे.
याच पूर्वाभिमुख असलेल्या लेणी क्रमांक तीनमध्ये दुर्मिळ पाषाणी कक्ष कोरण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मुख्य मध्यवर्ती गर्भगृह आहे. आयताकृती व्हरांड्यात सहा विशाल स्तंभ आहेत.ते भारतीय पुरातन विभागाने संवर्धन केलेले आहेत. राष्ट्रकूट शैली दर्शविणार्या विशाल द्वारपालांच्या प्रतिमा त्रिशाखायुक्त कोरीव द्वाराच्या दोन्ही बाजूस कोरलेल्या आहेत. याच लेण्या आता भेटी देण्यासाठी येणार्या लाखो देशी-विदेशी पर्यटकांसाठी अत्यंत धोकादायक बनल्याने केव्हाही कोसळून मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक वारसा लाभलेल्या एलिफंटा लेण्यांच्या देखभालीकडे होणार्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशीविदेशी पर्यटकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
दुरुस्तीसाठी बजेट नाही
भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मुंबई विभागाचे अधिकारी एलिफंटा केव्हजचे केअर टेकर कैलास शिंदे यांनी दुरुस्तीसाठी यावर्षी आर्थिक बजेट नसल्याचे सांगितले.