। महाड । वार्ताहर ।
महाड औद्योगिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे राजरोसपणे सुरु असलेल्या गुंडगिरी, दहशतीला कारखानदार व अधिकारी वैतागले असून येत्या काळात या दहशतीचा पूर्णपणे नायनाट करून औद्योगिक क्षेत्रातील वातावरण भयमुक्त करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि महाड विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी केले.
शैलेश देशमुख यांनी देशमुख कांबळे गावातून 100 टक्के मताधिक्य स्नेहल जगताप यांना देणार असल्याची ग्वाही दिली. आगामी काळात देशमुख कांबळे ग्रामपंचायतमधील सरपंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असेल असा विश्वास व्यक्त करत विचार एकत्र आल्याने परिवर्तन होणार आहे व त्या मध्ये देशमुख कांबळे गावाचा खारीचा वाटा असेल असे मत व्यक्त केले. देशमुख कांबळे येथील माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांचे चिरंजीव शिंदे गटाचे नेते उद्योजक शैलेश देशमुख यांच्यासह माजी सरपंच सरोज देशमुख, युवा सेना उप तालुका प्रमुख राकेश देशमुख, शंतनु देशमुख, राज देशमुख, रूपाली देशमुख यांच्यासह असंख्य शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला, त्यावेळी स्नेहल जगताप यांनी महाड औद्योगिक क्षेत्रातील राजकीय दहशतीवर जोरदार भाष्य केले. 20वर्षे कान्ट्रॅक्टमध्ये काम करूनही स्थानिक कामगारांना न्याय मिळत नाही, अशा अन्यायग्रस्त कामगारांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केले. यावेळी नानासाहेब जगताप, तालुकाप्रमुख आशिष फळस्कर, तालुका संघटक राजू कोर्पे, माजी जिप सदस्य अमित मोरे, संपर्क प्रमुख रघुविर देशमुख, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, सुदेश कलमकर रामतात्या देशमुख, शशिकांत देशमुख आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शैलेश देशमुखसह राकेश देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करत स्नेहल जगताप यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.