शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला

पेण तालुक्यात तयारी सुरु; उंच उंच होळ्या ठरताहेत आकर्षण

| हमरापूर | वार्ताहर |

मराठी सणांपैकी एक महत्त्वाचा असणारा सण म्हणजे होळी. दोन दिवसांवर आलेल्या या होलिकोत्सव या सणाची जय्यत तयारी सध्या पेण तालुक्यात सुरु आहे. ठिकठिकणाचे चाकरमानी या सणानिमित्त गावोगावी परतु लागल्याने उत्साह शिगेला पोहोचल्याचे वातावरण सध्या सर्वत्र दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात तालुक्यात होलिकोत्सवाची एक आगळीवेगळी ओळख आहे. मोठमोठ्या गगनचुंबी होळ्या उभारून उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवाची जय्यत तयारी आत्तापासूनच सुरू झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.


होलिकोत्सवाच्या या उत्सवाला शिमगोत्सव असेदेखील म्हटले जाते. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ अशा हाका मारण्याची प्रथा आजही कायम सुरु आहे. पेण तालुक्यात ते 15 दिवस अगोदरच या उत्सवाची उत्कंठा शिगेला लागलेली असते. होलिकोत्सवाची तयारी करणे, गावातील घराघरांत वर्गणी मागणे, ज्या ठिकाणी उत्सव साजरा होणार आहे तेथील स्वच्छता-सुशोभिकरण करणे, होळी पेटविण्यासाठी लागणारी लाकडे-ओंडके गोळा करणे, होळी उत्सव पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांमध्ये विविध प्रकारची जनजागृती करण्यासाठीच्या योजना आखणे आदी प्रकारची जय्यत तयारी आत्तापासूनच पेणमधील नागरिक, विविध मंडळे करीत आहेत.

पेण शहरासह तालुक्याचा विचार करता पेणमध्ये मोठमोठ्या गगनचुंबी होळ्या उभारल्या जातात. जवळपास 50 ते 80 फूट उंच अशा या गगनचुंबी होळ्या पाहण्यासाठी तालुक्यातीलच नव्हे तर, बाहेरील नागरिकदेखील येथे मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. या होळ्या उभारण्यासाठी बाजूच्या जंगलातून सावरीच्या झाडाचा ओंडका आणला जातो. हा आणताना जोरजोरात बोंबा मारणे, नाचगाणे करणे अशा प्रकारे ढोल-ताशांच्या गजरात ही होळी आणली जाते. या आणलेल्या होळीला मखराची सजावट केली जाते. मखर जोडल्यानंतर ही होळी उभी करण्याची खरी मोठी कसरत असते. जवळपास शंभर ते दीडशे लोक एकत्र येऊन मोठ्या गाजावाजात आणि अतिशय शिताफीने ही होळी उभी केली जाते. त्यावेळीदेखील नागरिक हा चित्तथरारक क्षण पाहण्यासाठी उपस्थित असतात.

कोळीवाड्यात उत्सव
पेण शहरातील कोळीवाड्यातील गगनचुंबी होळी ही पाहण्यासारखी असते. होळी सणाच्या पाच दिवस आधी कोळीवाड्यातील होळी उभी केली जाते. होळी उभी करतानाचे दृश्य पाहण्यासारखे असते. अनेक जण आपले बोललेले नवस फेडण्यासाठी येथे दरवर्षी येतात. विशेष म्हणजे होलिकामातेजवळील कोळी गीते आणि सुरू असणारे कोळी नृत्य तसेच विविध स्पर्धा हे एक वेगळेच आकर्षण असते. होळीपौर्णिमेच्या दिवशी पूजन करून आणि विशेष महत्त्व असणार्‍या पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून मध्यरात्री बारा वाजता या होळीला आरती करून झाल्यावर अग्नी देण्यात येते. होळी पौर्णिमेनंतर सलग पाच दिवस म्हणजेच रंगपंचमी पर्यंत या होळीची अग्नी सतत तेवत ठेऊन या विविध कार्यक्रम आयोजित करून आणि या अग्नीवर विविध प्रकारचे पदार्थ तयार करून या होळीच्या माळावर होळी उत्सव साजरा केला जातो.

आमच्या आळीमधील नागरिकांना वर्षभरातील सर्व कार्यक्रम आणि सण उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडण्याची आम्ही दरवर्षी होलिकामातेजवळ प्रार्थना करत असतो. गेली अनेक दशके पूर्वापार चालत आलेला सण आजही तसाच्या तसा पार पाडण्यात यशस्वी ठरत असतो.

हितेश पाटील, श्री गणेश मित्रमंडळ कुंभार आळी, पेण
Exit mobile version