पनवेल आगार उभारणीचा वनवास संपता संपेना

नागरिकांच्या उद्रेकाची वाट पाहू नका; प्रवासी संघटनेचा एसटी महामंडळाला इशारा

। पनवेल/उरण । वार्ताहर ।

पनवेलच्या राज्य परिवहन मंडळाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचे घोंगडे गेली 14 वर्षे भिजत पडले आहे. आद्यपही अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला सदरचा प्रकल्प विकसक आणि महामंडळ प्रशासनाच्या धिम्या कार्यपद्धतीमुळे लाल फितीत अडकला असल्याचे स्पष्ट झालेले आहे.याबाबत पनवेल प्रवासी संघटनेने प्रवाशांच्या उद्रेकाची वाट पाहू नका,असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

आगाराचे काम तातडीने सुरु व्हावे यासाठी गेल्या महिन्यात पनवेल येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची दखल घेत परिवहन मंडळाच्या उप महाव्यस्थापक विद्या भिलारकर यांच्या समवेत विकसक आणि पनवेल प्रवासी संघाची बैठक मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी पार पडली. विकसक आणि महामंडळ प्रशासनास अभ्यासपूर्ण पद्धतीने धारेवर धरले असता हा प्रकल्प अद्यापही लाल फितीत गुरफटला असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले.

पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळामध्ये कार्याध्यक्ष अभिजित पाटील,उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, सचिव श्रीकांत बापट,रमेश जानोरकर,मंदार दोंदे,निलेश जोशी,गौतम अगरवाल आदी सहभागी झाले होते. सदरच्या कामाचे विकसक म्हणून ज्यांच्या समवेत करार झाला आहे त्या मे पनवेल मास ट्रान्झिट प्रोजेक्ट्स प्रा.ली. चे प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या सह पूर्ण टीम उपस्थित होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प बांधा व हस्तांतरित करा या स्वरूपाचा असून सुद्धा राज्य शासन हा प्रकल्प सामान्य पद्धतीचा पुनर्बांधणी प्रकल्प म्हणून गृहीत धरत होत. अखेरीस पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयात जाऊन न्यायिक लढाई देत सदरचा प्रकल्प बांधा व हस्तांतरित करा या स्वरूपाचा असल्याचे सिद्ध करण्यात चार वर्षे वाया गेली आहेत.34,500 चौ.मीटर भूखंडावर राबविण्याच्या प्रकल्पाचे यापूर्वी विविध कारणांनी तीन आराखडे बनविले गेले आहेत. तूर्तास सदरच्या भूखंडावर 16,500 चौ.मीटर वर एस टी पोर्टल उभारले जाणार असून 19,250 चौ.मी. वर खासगी निवासी/वाणिज्य प्रकल्प निर्माण होणार आहे. परंतु सदरचा आराखडा राज्य परिवहन विभागाकडे मंजुरीसाठी दिला असल्याचे विकासकाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

एकंदरीत लाल फितीत अडकलेला प्रकल्प, गर्द लाल फितीत अडकला आहे. विशेष लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे मूळच्या 235 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे पाच वर्षे काम सुरु न झाल्याने मूल्य वर्धन होणार आहे. त्यासाठीच तर हा सगळा अट्टाहास नाहीना ? अशी शंका देखील उपस्थित होते.

ज्या प्रवासी बांधवांच्या साठी हे स्थानक उभारले जाते आहे ते मात्र अनंत अडचणींचा सामना करत आहेत हे निदर्शनास आणून दिल्यानंतर पुढच्या आठवडयातील बुधवारी स्वतः विद्या भिलारकार, कार्यकारी अभियंते विजय रेडेकर,विभागीय अभियंते विजय सावंत हे येऊन पनवेल स्थानकाचा दौरा करणार आहेत. त्यांनी सुचविलेली दुरुस्तीची कामे तातडीने करून देणार असल्याचे विकासकाच्या प्रतिनिधींनी कबूल केले.

अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाप्रमाणे ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे..’ पण त्यासाठी इच्छाशक्ती लागते. अजूनही वेळकाढू पणा करणार असाल तर नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. ती वेळ येऊ देऊ नका.

डॉ भक्तीकुमार दवे
प्रवासी संघ अध्यक्ष

2009 साली पनवेल स्थानकातील जुनी इमारत पाडल्यानंतर या स्थानकात पुनर्बांधणी करण्याकरता आम्ही पाठपुरावा करत आहोत. परंतु बांधा आणि हस्तांतरित करा या धरतीवरती बराच कालखंड कुणी कंत्राटदार तयार होत नव्हते, बर्‍याच अडचणींचा सामना करत कुठेतरी आता अंतिम आराखडा मंजुरीपर्यंत आपण येऊन ठेपलेले आहोत. दरम्यानच्या कालखंडात 235 कोटी रुपये खर्च अपेक्षित असणार्‍या या प्रकल्पावर आता साधारणपणे 400 कोटीहून अधिक रक्कम खर्च करावी लागेल. पुनर्बांधणी प्रकल्पामध्ये उशीर होत असल्याकारणाने निश्‍चितच आता या प्रकल्पासाठी लागणारा खर्च वाढतो आहे.

विद्या भिलारकर
उप महाव्यवस्थापक (बांधकाम)
Exit mobile version