सामराजगडाचे अस्तित्व धोक्यात

शिवरायांनी टेहळणीसाठी उभारला होता गड

| मुरुड-जंजिरा | सुधीर नाझरे |

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात एकदरा गावाजवळ वसलेला सामराजगड हा शिवकालीन दुर्ग आजही इतिहासाच्या साक्षीने उभा असला, तरी दुर्लक्षामुळे हळूहळू अस्तित्व गमावत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा मोहिमेदरम्यान टेहळणीसाठी उभारलेला हा गड सध्या संवर्धनाच्या प्रतीक्षेत असून त्याचे बुरुज व तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत.

मुरुडच्या दक्षिणेस सुमारे 80 मीटर उंचीवर असलेला हा गड धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथून जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजपुरी खाडी तसेच अरबी समुद्राचा विस्तीर्ण परिसर नजरेत ठेवता येतो. मराठा आरमारासाठी आणि सिद्दींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा प्रभावी वापर होत असे.

इतिहासाच्या नोंदीनुसार, जंजिरा जिंकण्याच्या मोहिमेदरम्यान या गडाची उभारणी करण्यात आली असावी. काही इतिहासकारांच्या मते, 1659 ते 1661 दरम्यानच्या मोहिमांमध्ये या गडाची निर्मिती झाली. शामराज निळकंठ या पेशव्यांच्या नावावरून ‌‘सामराजगड’ हे नाव पडल्याचीही शक्यता वर्तवली जाते. तसेच संभाजी महाराजांनी येथून जंजिरावर तोफगोळ्यांचा मारा केल्याच्या उल्लेखामुळे या गडाचे लष्करी महत्त्व अधोरेखित होते.

आज गडावर उद्ध्वस्त प्रवेशद्वार, तटबंदीचे अवशेष आणि काही वीरांची स्मारके दिसून येतात. मात्र, कोणतीही देखभाल नसल्याने गड झाडाझुडपांत हरवत चालला आहे. सध्या काही ठिकाणी स्थानिकांनी केलेले बांधकाम आणि तात्पुरत्या स्वरूपातील वापर यामुळे गडाचे मूळ स्वरूप धोक्यात आले आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही सामराजगड अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. मुरुड-जंजिरा आणि पद्मदुर्ग पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या गडाचा समावेश केल्यास एक समृद्ध ऐतिहासिक अनुभव मिळू शकतो. गडावर बुरुजांचे पुनर्बांधकाम, परिसर सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्यास हा परिसर आकर्षणाचे केंद्र बनू शकतो. राज्यातील अनेक किल्ल्यांसाठी निधी उपलब्ध होत असताना सामराजगड मात्र दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त होत आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष देऊन संवर्धनाची ठोस पावले उचलावीत, अशी मागणी दुर्गप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version