एक्झिट पोलने वाढवली रायगडातील कार्यकर्त्यांची धडधड

| तळा | प्रतिनिधी |

शनिवारी विविध प्रसारमाध्यमांनी दर्शविलेल्या एक्झिट पोलमुळे रायगडातील कार्यकर्त्यांची धडधड वाढली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रायगड लोकसभेसाठी रहायुतीकडून सुनिल तटकरे तर इंडिया आघाडीकडून सहावेळा खासदार राहिलेले अनंत गीते एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. 2014 साली झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. 2019 च्या निवडणुकीत अनंत गीते यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असल्याने सर्वच गणिते बदललेली आहेत.

याआधी अनंत गीते यांनी शिवसेना, भाजप व आरपीआयच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. तर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व काँग्रेस युतीतून निवडणूक लढवली होती. आता मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या दोन गटानंतर पूर्णतः समीकरणे बदलली असून या निवडणुकीत अनंत गीते शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस व शेकाप या इंडिया आघाडीकडून निवडणुक लढले आहेत. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदेगट व भाजप आणि आरपीआय या महायुतीतून निवडणुकीला सामोरे गेले आहेत. ज्या अल्पसंख्याक मतांच्या जोरावर सुनील तटकरे आघाडीवर असायचे त्या मुस्लिम समाजाने या निवडणुकीत अनंत गीते यांना भरभरून मतदान केले असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे नक्की कोणाचे पारडे जड आहे, हे सांगणे यावेळी जाणकारांनाही कठीण जात आहे. अशातच प्रसारमाध्यमातील काही वाहिन्यांनी अनंत गीते हे विजयी होतील असा अंदाज वर्तविल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था पसरली आहे. आता यातील कोण विजयी होईल हे चार जून रोजी स्पष्ट होईलच परंतु दोन्ही नेत्यांच्या विजयाबद्दल लावण्यात येत असलेल्या अंदाजामुळे कार्यकर्त्यांची धडधड मात्र वाढली आहे.

Exit mobile version