माथेरानच्या पंचशील नगरचे रुपडे पालटतंय

। माथेरान । वार्ताहर ।
गावाचा विकास होत असताना अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेले पंचशील नगर विकासात्मक दृष्टीने नव्या उगमाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अनेकदा या ठिकाणी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत आलेल्या निधीचा उपयोग करून घेतला गेला नाही. त्यामुळे हा भाग खूपच मागासलेल्या अवस्थेत होता. पंचशील नगरच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. त्या भागाचा एकप्रकारे उकिरडा बनला होता. सर्व घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी सुयोग्यप्रकारे गटारे बांधण्यात आलेली नसल्याने त्या ठिकाणी वास्तव्यास असणार्‍या झोपडपट्टी जवळून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहून जात असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. याकामी सत्ताधारी गटाने विरोधी पक्षाला विचारात घेऊन या ठिकाणी सुयोग्य नियोजन करून झोपडपट्टी भागाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत सांडपाणी वाहून नेण्यासाठी जांभ्या दगडात अद्ययावत गटारे बांधण्याची कामे अंतिम टप्प्यात असून या भागाच्या प्रवेशद्वारापासून उत्तम प्रकारे गटारांचे बांधकाम पूर्ण केलेली आहेत. विविध कार्यक्रमांसाठी स्टेजचे सुशोभीकरण केले आहे तर आबालवृद्ध मंडळींना बसण्यासाठी मधोमध छोटेसे पटांगण क्ले पेव्हर ब्लॉक मध्ये करण्यात आले आहे. आवश्यक भागात संरक्षण भिंती उभारल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version