| माणगाव | प्रतिनिधी |
संपूर्ण माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्त मंदिराचा जत्रोत्सव कार्यक्रम शनिवारी (दि.11) मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या जत्रौत्सवात यात्रेकरूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन जत्रौत्सव कमिटीने केले आहे.
माणगाव येथील श्री दत्त मंदिर जत्रोत्सवाकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून असते. तालुक्यातील आसपासच्या 200 ते 250 गाव, वाडी वस्त्यांतील नागरिक या जत्रेचा आनंद घेण्यासाठी येत असतात. माणगावात मुंबई-गोवा महामार्ग, मोर्बारोड मार्ग व कचेरी रोड-निजामपूर या रस्त्यांच्या दुतर्फा विविध प्रकारची दुकाने थाटून ही जत्रा सजलेली असते. या जत्रेत माणगावची ग्रामदैवत वाकडाई देवी मंदिराची पालखी येत असते. तसेच, कोस्ते आदिवासीवाडी, पानोसे, खांदाड, उतेखोल इत्यादी गावांतून जत्तर काठ्या येत असतात. दरवर्षी हजारोंच्या संख्येने नागरिक या जत्रौत्सवाचा आनंद घेत असतात. या यात्रेत एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
या जत्रौत्सवाबाबत माणगाव येथील प्रतीथयश विधिज्ञ ॲड. केदार गांधी यांच्या निवासस्थानी रविवारी (दि.5) बैठक पार पडली. यावेळी जत्रौत्सव कमिटीचे माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, ॲड. केदार गांधी, अमोल मोने, तेजस गांधी, काशीराम पोवार, गोविंद पोवार, नथुराम पोवार, महेंद्र मेथा, नामदेव खराडे, सचिन देसाई, सुधाकर पालकर व संतोष मांजरे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी माणगावच्या या जत्रेचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेऊन हि यात्रा शांततेत व उत्साहात पार पाडावी, असे आवाहन जत्रौत्सव कमिटीतर्फे करण्यात आले .







