आ. जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यानेच कामाला सुरुवात
। रायगड । प्रतिनिधी ।
शेकापचे आ. जयंत पाटील यांनी अधिवेशनात एखादा प्रश्न मांडला आणि तो सरकारने सोडवला नाही, असे कधीच झाले नाही. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी आता सात मजल्यांची सुसज्ज इमारत उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी तब्बल 150 कोटी 68 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र याचे श्रेय लाटण्यासाठी स्थानिक आमदार आणि त्यांचे समर्थक चांगलेच हापापले आहेत. त्यांच्याकडून आपणच काम केल्याची शेखी समाजमाध्यमांवर मिरवण्यात येत आहे. परंतु, जनता सुज्ञ असून अलिबाग आणि पर्यायाने रायगडच्या जनतेचा विकास करण्याची धमक फक्त शेकापमध्येच आहे, हे पुन्हा एकदा आमदार जयंत पाटील यांनी सिध्द केले आहे. नेहमीप्रमाणे चांगले काम झाले किती आम्ही केले असा आव स्थानिक आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी आणण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक आमदार आणि समर्थकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत आमच्या प्रयत्नाने नव्याने उभी राहत असल्याचे खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न समाज माध्यमांवर सुरु केला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी गतवर्षीच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात जिल्हा सामान्य रुग्णालय नव्याने बांधण्याबाबतची मागणी सभागृहासमोर केली होती. आमदार जयंत पाटील यांनी केलेली मागणी आणि पाठपुराव्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाची सात माजली इमारत उभारण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे. तरीही देखभाल, दुरुस्तीच्या नावाखालीदरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. ते तातडीने बंद करुन सरकारने कृषी विभागाच्या जागेत रुग्णालयाची अद्ययावत अशी वास्तू उभारावी, अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात केली होती. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशन संपेपर्यंत याबाबत बैठक घेऊन सरकारने तोडगा काढावा, असे निर्देश सरकारला दिले होते. दरम्यान, मुंबईत बुधवारी 2024 रोजी झालेल्या हाय पॉवर कमिटीच्या बैठकीत या सरकारी रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्य सचिव उपस्थित होते.
काय म्हणाले होते आ.पाटील
आतापर्यंत या इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आलेला आहे. त्या खर्चात किमान तीन रुग्णालयांची उभारणी करता आली. असती, असे त्यांनी निदर्शनास आणले. यावर्षीही 13 कोटींचा निधी देखभाल, दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी ही वास्त्ूा आहे, तो परिसर इको झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. नवीन इमारत बांधल्यास परिसरातील दोन मैदानांना धोका निर्माण होणार आहे. शिवाय या परिसरातच बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. त्यांनाही अडचण निर्माण होणार आहे. यासाठी सरकारने कृषी विभागाच्या जागेत हे रुग्णालय उभारले तर चांगली इमारत उभी राहिल आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील, अशी अपेक्षाही गतवर्षीच्या पावसाळी अधिवेशनात 18 जुलै 2023 रोजी व्यक्त केली होती.
कसे असेल रुग्णालय
रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाची नवी इमारत सात मजली असणार आहे. 2 लाख स्केअर फूट इतके बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये 380 बेडना शासनाने मंजुरी दिली आहे. सुमारे सव्वा 400 कोटी रुपये या रुग्णायलयाचे अंदाजपत्रक आहे. पैकी इमारत बांधकामासाठी 150 कोटी 68 लाख निधी खर्च होणार आहे.300 बेडसह 20 बेडचे वेगळे आयसीयू कक्ष असणार आहे. 16 बेडचे नवजात बालकक्ष, 20 बेडचे डायलिसिस सेंटर, रुग्ण थांबा कक्ष, अपघात विभाग तसेच अपघात विभागात वेगळे शस्त्रक्रिया कक्षही उभारले जाणार आहे. इमारतीत पाच मोड्युलर अद्यावत असे यंत्र सामुग्रीसह शस्त्रक्रिया कक्ष ही बांधले जाणार आहेत. यामध्ये अथम, अर्थो, जनरल, स्त्री रोग शस्त्रक्रिया कक्ष असणार आहे. एचआयव्ही, एचएसबी बधितासाठीही वेगळे शस्त्रक्रिया कक्ष राहणार आहे. याशिवाय लॉड्री, पाककक्ष, क्ष-किरण कक्ष, चार लिफ्ट, दोन जिने, एक रॅम्प अशी सुविधा इमारतीमध्ये असणार आहे.