टी 20 विश्वचषक स्पर्धा; रोहित, हार्दिकची सुमार कामगिरी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
बीसीसीआयने टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी आधीच भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हातात आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून काम करताना दिसणार आहे. टी 20 विश्वचषक सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पण आयपीएलचा हा हंगाम भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या या दोघांसाठी वाईट गेला आहे. त्याच वेळी, त्यांच्या आयपीएल संघ मुंबई इंडियन्सची कामगिरी देखील या हंगामात सर्वात खराब राहिली. आणि मुंबई या हंगामात बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे. आता या दोन खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे टी 20 विश्वचषकापूर्वी चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण टी 20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी कर्णधार आणि उपकर्णधार फॉर्मात नसतील तर संघ विश्वविजेता कसा होणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
रोहित शर्माची आयपीएल
2024 मधील कामगिरी
रोहित शर्माने आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केली. पण रोहित ज्या प्रकारे शेवटच्या 6 डावात फलंदाजी करत आहे ते टी 20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी चांगले लक्षण नाही. या हंगामात आतापर्यंत रोहितने 13 सामन्यांत 349 धावा केल्या आहेत. या काळात रोहितनेही शतक झळकावले आहे. रोहितच्या शेवटच्या 6 डावांबद्दल बोलायचे झाले तर हिटमॅनच्या बॅटमधून केवळ 53 धावा आल्या आहेत. टी 20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला नाही तर भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात.
हार्दिकची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. मुंबई इंडियन्ससोबतच हार्दिकची कामगिरीही या हंगामात खूपच खराब राहिली. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दुखापत झाल्यानंतर हार्दिक क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता, या हंगामात पांड्याने पुनरागमन केले पण तो फॉर्ममध्ये नाही. या हंगामात फलंदाजी करताना हार्दिकने 13 सामन्यांच्या 12 डावात केवळ 200 धावा केल्या आहेत. याशिवाय पांड्याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर गोलंदाजीतही त्याला काही आश्चर्यकारक करता आले नाही. या हंगामात आतापर्यंत पांड्याला 11 बळी घेता आले आहेत. गोलंदाजीतही पांड्या चांगलाच महागडा ठरला आहे.
सलामीसाठी विराट उत्तम पर्याय : सौरभ गांगुली भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले. गांगुली यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये छान फलंदाजी करीत आहे. कर्णधार रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करतो. त्याच्यासोबत कोणता खेळाडू सलामीला फलंदाजी करील, याची उत्सुकता आहे. पण विराट कोहलीने रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करावी, असे सौरव गांगुली यांना वाटते. त्यामुळे भारताचा फलंदाजी विभाग आणखी मजबूत होईल, असे यामागील कारण आहे. सौरव गांगुली यांनी टी-20 विश्वकरंडकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाचे कौतुकही केले. ते म्हणाले, भारताचा संघ समतोल आहे. फलंदाजी, तसेच गोलंदाजीमध्ये भारतीय संघ समतोल दिसून येत आहे. जसप्रीत बुमरा अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज व कुलदीप यादव यांच्या समावेशाने अनुभवाची भर टीम इंडियात पडली आहे. सौरव गांगुली यांनी टी-20 क्रिकेटबद्दलही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, संजू सॅमसन हा काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की, टी-20 क्रिकेटमध्ये विश्रांतीला वेळ नसतो. प्रत्येक चेंडू हा टोलवावाच लागतो. यावरूनच टी-20 हे आक्रमक क्रिकेट आहे याची प्रचिती मिळते. यापुढेही असेच चित्र पाहायला मिळणार आहे.सध्या टी-20 लढतीत बहुतांशी वेळा 240 ते 250 धावा होताना दिसतात. भारतातील मैदाने लहान आहेत. तसेच खेळपट्ट्याही फलंदाजांना पोषक अशा बनवल्या जातात. इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे अधिक फलंदाजांचा संघात प्रवेश होतो. या सर्व कारणांमुळे धावांचा पाऊस पडतो. त्यामुळे गोलंदाजांकडे कौशल्य असण्याची गरज आहे. जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव यांसारख्या गोलंदाजांनी ठसा उमटवला आहे. बुमरा, कुलदीप, अक्षर पटेल हे तीनही प्रकारात सातत्याने खेळून प्रभाव टाकत आहेत, असे सौरव गांगुली म्हणाले.