१४७ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत होणार कैद

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात एकूण 14 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पार पडत आहे. निवडणुकीसाठी एकूण 41 बूथ आहेत. दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व शासन यंत्रणा सज्ज झाली आहे.

प्रत्येक बूथवर मतदान स्टाफ 5 प्रमाणे 205 कर्मचारी कामकाज पाहणार आहेत. या निवडणुकीत सिद्धेश्‍वर, आपटवणे, माणगाव बुद्रुक, चंदरगाव, खांडपोली, हातोंड, चिवे, घोटवडे, ताडगाव, खवली, तिवरे, शिलोशी, अडुळसे, आतोणे या 14 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 14 सरपंचपदासाठी उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. यापैकी चिवे व खांडपोली ग्रामपंचायत सरपंच निवडणूक बिनविरोध झाली आहे. सदस्यपदासाठी एकूण 110 जागा आहेत. यापैकी 50 सदस्य बिनविरोध निवड झालेले आहेत. तर उर्वरित 60 सदस्यपदासाठी निवडणूक होणार असून, यासाठी 122 उमेदवार रिंगणात आहेत. 12 ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी एकूण 25 उमेदवार रिंगणात नशीब अजमावत आहेत.

यासंदर्भात पाली तहसिल कार्यालयात तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मतदान प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पाडणे, सर्व नियुक्त केलेले कर्मचारी याना बुथवर वेळेत पोहच करणे, मतदान झाल्यानंतर माघारी आणणे, याबाबत सूचना दिल्या, मतदान प्रक्रियेदरम्यान होणार्‍या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या बैठकीस पोलीस निरीक्षक विश्‍वजित काईनगडे, निवासी नायब तहसिलदार दत्तात्रेय कोष्टी, नायब तहसीलदार वैशाली काकडे, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद हरणे, निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच कर्मचारी उपस्थित होते.

मतदान प्रक्रिया सुरळीत पाडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुरक्षा प्रस्थापित राहावी यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस निरीक्षक विश्‍वजित काईनगडे यांच्या देखरेखीखाली 14 ग्रामपंचायतीच्या 41 बुथवर 56 पोलीस कर्मचारी, सहायक पोलिस निरीक्षक 02, पोलीस उपनिरीक्षक: 04, होमगार्ड 11 असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मतमोजणी दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता तहसिल कार्यालय सुधागड हिरकणी कक्षात होणार आहे.

Exit mobile version