| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे मतदान मंगळवारी (दि.2) शांततेत पार पडले. माथेरान पालिकेच्या दहा प्रभागात 85.35 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक लढविणारे थेट नगराध्यक्षपदाचे दोन आणि 20 सदस्यपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व 46 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. माथेरान पालिकेसाठी मतदार असलेल्या 4055 पैकी 3461 मतदारांनी मतदान केले. दरम्यान, पालिकेच्या दहा प्रभागात एक प्रभागातील बॅलेट युनिट वगळता अन्य सर्व ठिकाणी मतदान शांततेत आणि सुरळीत मतदान पार पडले.

माथेरान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी माथेरान शहरातील दहा प्रभागात मतदान झाले. त्या दहा प्रभागातून 20 उमेदवार निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी दोन आणि सदस्यपदाच्या 20 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी सकाळी मतदान सुरू झाले त्यावेळी सर्व मतदान यंत्र आणि बॅलेट युनिट सुरळीत सुरू होती. मात्र, प्रभाग दोनचे मतदान केंद्र असलेल्या कम्युनिटी सेंटर येथील मतदान बॅलेट युनिट दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बंद पडले. त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले. मात्र, पावणेचार वाजता बॅलेट युनिट नवीन आणून बसवण्यात आले. त्यानंतर तेथील मतदान केंद्र अधिकारी यशवंत वाघरे यांनी आधी ज्येष्ठ मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रात प्रवेश दिला.
निवडणुकी दरम्यान शहरात खेळीमेळीचे वातावरण दिसून आले आणि सर्व निवडणूक शांततेत पार पडली. माथेरानमधून बाहेर राहण्यास गेलेले मतदार निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर शहरात आल्याने निवडणुकीत अधिक मतदानाची नोंद झाली. शहरात एकूण 4055 मतदार असून त्यातील 3461मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यात दुपारनंतर फार तुरळक प्रमाणात मतदार मतदान केंद्रावर येत असल्याचे दिसून आले. निवडणुकीची सर्व ने-आण करण्यासाठी पर्यावरण पुरक ई-रिक्षा यांचा वापर करण्यात आल्याने निवडणुकीचे कर्मचारी यांना काहीसे हायसे वाटले. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर, सह निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे आणि निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे यांच्याकडून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी झोनल अधिकारी सातत्याने मतदान केंद्र अधिकारी यांच्या संपर्कात होते. सकाळच्या वेळी प्रभाग दहा मधील पैशाची बॅग वगळता अन्यत्र शांततेत मतदान पार पडले.







