निवड समितीमध्ये दिग्गज क्रिकेटपटूंचा प्रवेश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एकेकाळी भारतीय संघातील महत्त्वाचे खेळाडू मानले जाणारे आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा आता भारतीय क्रिकेटमध्ये नवीन भूमिका घेणार आहेत. हे दोघेही अनुभवी खेळाडू आता निवड समिती म्हणून भारतीय संघाला बळकट करण्यासाठी काम करणार आहेत. माजी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा आणि माजी डावखुरा वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंग हे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरुष वरिष्ठ निवड समितीचे नवीन सदस्य होऊ शकतात.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गेल्या महिन्यात दोन राष्ट्रीय निवड समितीच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. मिळालेल्या मसहितीनुसार, निवड समितीमध्ये कोणत्याही प्रमुख व्यक्तींनी रस दाखवला नाही. माजी भारतीय वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने राष्ट्रीय निवड समितीसाठी अर्ज केला होता. त्याच्याशिवाय, उत्तर प्रदेशचा माजी वेगवान गोलंदाज आशिष विन्स्टन झैदी आणि हिमाचल प्रदेशचा शक्ती सिंग हे मध्य विभागातील इतर उमेदवार होते. भारतीय बोर्डाने संघाचे दोन निवृत्त निवडकर्ते, सुब्रतो बॅनर्जी (मध्य विभाग) आणि एस. शरथ (दक्षिण विभाग) यांना बदलण्यासाठी काही निकष निश्चित केले होते. बीसीसीआयच्या मते, ज्यांनी किमान 7 कसोटी सामने, 30 प्रथम श्रेणी सामने, 10 एकदिवसीय सामने किंवा 20 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत तेच या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र होते. अर्जदारांनी किमान 5 वर्षांपूर्वी खेळातून निवृत्ती घेतलेली असावी आणि एकूण 5 वर्षांसाठी बीसीसीआयच्या कोणत्याही क्रिकेट समितीचे सदस्य नसावेत.
आरपी सिंगने 2005 ते 2011 दरम्यान 14 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. तसेच, 2008 ते 2013 दरम्यान प्रज्ञान ओझाने 24 कसोटी, 18 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने खेळले आहेत. कार्यपद्धतीनुसार, अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश असलेली क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) वरिष्ठ निवड समितीमधील दोन्ही पदांसाठी उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. त्यानंतर सीएसीने निवडलेल्या उमेदवारांच्या नावांची बीसीसीआय अधिकाऱ्यांना शिफारस करणार आहे. त्यामुळे दोन्ही नवीन निवडकर्त्यांनी पुढील महिन्यात पदभार स्वीकारण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.
