आदिवासींच्या नशिबी यातनामय जीवन

पोटाची खळगी भरण्यासाठी शिडीचा आधार
पायाभूत सुविधांपासून अद्याप वंचित
I माथेरान I वार्ताहर I
रायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. परंतु, आजही माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या अनेक आदिवासीवाड्यांवर जाण्यासाठी चांगल्या स्थितीत रस्ते नाहीत. येथील आदिवासी बांधवांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी माथेरानला नियमितपणे जावे लागते. त्यासाठी डोंगरदर्‍यांतून वाट काढत, पस्तीस ते चाळीस फुटांच्या लाकडी शिड्या चढून आजूबाजूला असणार्‍या दरीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास एखाद्यावेळी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, याचे शासन वा स्थानिक प्रशासनाला सोयरसुतक नाही.देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पाऊणशे वर्षे होत आली आहेत; परंतु या देशातील तळागाळातील आदिवासी समाज आजही अनेक विकासापासून, शिक्षणापासून, मूलभूत सेवासुविधांपासून वंचित असल्याने अजूनही आपण पारतंत्र्यात आहोत की काय, असा प्रश्‍न हे आदिवासी बांधव स्वतःच्या अंतःकरणाला नक्कीच विचारत असतील, यात शंकाच नाही.रायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ म्हणून अशा थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध आहे याच माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या अनेक आदिवासी वाड्यांवर जाण्यासाठी चांगल्या स्थितीत रस्ते नाहीत. यातील बहुतेक वाड्यांतील आदिवासी बांधव हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी माथेरानला नियमितपणे येत असतात, कुणी मोलमजुरी तर कुणी भाजीपाला, मासे प्रत्येक ऋतूप्रमाणे माल विक्रीसाठी घेऊन येतात. काहींची मुले इथे दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट करून हे उभे डोंगर चढून वर येतात.

या वाड्यांतील एक भाग असलेल्या वरोसा, उंबरवाडी, पिरकट वाडी तीन वाड्यांचा खोंडा नावाने प्रसिद्ध असलेल्या या आदिवासी गावांना आपल्या उपजीविकेसाठी, मोलमजुरी कामासाठी माथेरानलाच यावे लागते. यासाठी गावापासून छोट्या पायवाटेने चढाव चढत माथेरानला पोहोचायला दोन ते अडीच तास लागतात. प्रचंड उभा चढाव, त्यातच अगदी पाय बसेल एवढीच पाऊलवाट आणि पुढे पुढे अश्यक्यप्राय अशा एकूण तीन पस्तीस ते चाळीस फूट उंचीच्या लाकडी शिड्या चढून आजूबाजूला खोल दरी अशा अवस्थेत या दरीतून जीवघेणा प्रवास करत ही मंडळी दररोज, वर्षोनुवर्षे केवळ आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी येत आहेत.

शिडीमार्गच जवळचा
आम्हाला पोटापाण्यासाठी उदरनिर्वाह कामधंदा, इतर सर्वच गोष्टीसाठी माथेरानला यावे लागते. त्यासाठी शिडीचा मार्गच जवळचा वाटतो. परंतु, प्रलयंकारी पावसामुळे ती शिडीच वाहून गेल्याने आम्हाला जीव मुठीत घेऊन लाकडाच्या शिडीचा आधार घ्यावा लागतो. तरी, लोखंडी शिडी कोणीतरी दानशूर व्यक्तींनी बसून द्यावी, अशी विनंती ग्रामस्थ राजू उघडे, देहू पारधी यांनी केली आहे.

Exit mobile version