वडिलांनी जपल्या लेकीच्या आठवणी

भवितव्यासाठी ठेवलेल्या रकमेतून दिली रुग्णवाहिका

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

एका पित्याने लेकीच्या भवितव्याकरिता साठविलेल्या रकमेतून रुग्णवाहिका देऊन तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक संस्था उभारली आहे. उद्योजक तथा शिवसेना सुधागड तालुका संपर्क प्रमुख (उबाठा) विनेश सितापराव यांनी हे विधायक कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विनेश सितापराव यांनी सांगितले की, प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भवितव्याकरिता काही तरी आर्थिक तजवीज कर असतो. मीसुद्धा तसाच विचार करून मुलीचे भवितव्य सुरक्षित राहावे याकरिता प्रयत्न करत होतो. दुर्दैवाने वैष्णवीला दुर्धर आजाराने गाठले आणि कोरोना काळात माझे प्रयत्न अपुरे पडले. वैष्णवीला देवज्ञा झाली. यातून सावरून मुलीचे नाव कायमस्वरूपी आठवणीत राहावे या भावनेतून सितापराव प्रतिष्ठान निर्माण करण्यात आली. त्यानुसार मुलीच्या भवितव्याकरिता साठवलेली रक्कम समाजकार्याकरिता उपयोगात आणायचे ठरवले होते. त्यानुसार सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलींच्या स्मृती सामाजिक कार्यातून कायम जिवंत ठेवण्याचे हेतूने ही रुग्णवाहिका भेट दिली आहे.

तसेच सुधागड तालुक्यात येत्या काळात नांदगाव विभागासाठी सितापराव प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्ण सेवेकरिता रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे सितापराव यांनी सांगितले. सदर सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध असणार आहे. सुभाष रोड गणपती मंडळ विलेपार्ले पूर्व या मंडळास नुकतीच ही रुग्णवाहिका समर्पित करण्यात आली आहे. यावेळी सदर मंडळाचे अध्यक्ष अनिल कावळे, अशोक कावळे, मंगेश कावळे तसेच सितापराव प्रतिष्ठानचे विनेश सितापराव, गणेश सितापराव, प्रथमेश पवार उपस्थित होते.

Exit mobile version