बिबट्याची भीती संपेना..

घोड्याला जखमी केल्याचा संशय

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरातील समिरा भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. आता आक्षीबरोबरच थेरोंड्यामध्येदेखील बिबट्या फिरत असून त्याने एका घोड्याला जखमी केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र वन विभागाने याला पुष्टी दिलेली नाही.

नागाव परिसरात बिबट्या दिसून आल्याचे सोशल मिडियावर व्हायरल झाले असताना आता आक्षी परिसरात त्याचा वावर दिसून आल्याची चर्चा आहे. त्यात थेरोंडा येथील एका घोड्यावर हल्ला झाला असून तो जखमी झाल्याची चर्चादेखील जोर धरू लागली आहे. या चर्चेने आजूबाजूच्या गावांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दहशतीचे वातावरण पसरू लागले आहे. वन विभाग गेल्या चार दिवसांपासून गस्त वाढवून बिबट्याला शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र अद्यापही त्यांना कोणताही सुगावा लागलेला नाही.

थेरोंडा येथील गोंधळी गल्लीजवळील हिरानंदानी परिसरात मोकळ्या जागेत दर दिवशी घोड्याला बांधून ठेवले जाते. सोमवारी सकाळी बांधलेल्या घोडयाला बघायला गेलो. त्यावेळी त्याच्या मानेवर चावा घेतलेले दिसून आले. तसेच, शरीरावर नखांनी ओरबडलेले आढळून आले. वाघाने हल्ला केल्याने जखमी झाल्याचा संशय आहे.

राज बळी, थेरोंडा

बिबटया आढळून आल्याच्या चर्चेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून गस्त सुरु आहे. अद्यापपर्यंत बिबटा सापडला नाही. बिबटया त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांवर हल्ला करीत नाही. जर हल्ला केला तर तो त्या प्राण्यांना ठार करतो. परंतु गस्त अजूनही चालूच आहे.

नरेंद्र पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, अलिबाग


Exit mobile version