मनोरंजनार्थ रात्री दहा वाजता ‘द. दमयंती दामले’ नाटकाचे आयोजन
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावची ग्रामदेवता आई कृष्णादेवीचा सोहळा शनिवार, दि. 2 मे रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गावचे प्रमुख रवींद्र घरत आणि युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक यांनी दिली.
दरवर्षी आई कृष्णादेवीचा उत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. यंदाच्या उत्सव सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सोहळ्याच्या प्रारंभी शनिवारी सकाळी आठ वाजता मधुकर नाईक यांच्या घरापासून देवीच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर कृष्णादेवीच्या मंदिरात श्रीसत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता चौलमळा कृष्णादेवी प्रासादिक मंडळाचे भजन होणार आहे. यावेळी बुवा चंद्रकांत नवगावकर यांना विकास पाटील, प्रथमेश पाथरे आणि अजय वाडकर पखवाजाची साथसंगत करणार आहेत, अशी माहिती भजन मंडळाचे अध्यक्ष अल्पेश म्हात्रे यांनी दिली. तसेच ग्रामस्थांच्या मनोरंजनार्थ रात्री दहा वाजता
कौटुंबिक आणि कॉमेडी असे ‘द. दमयंती दामले’ नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या नाटकामध्ये कलाकार म्हणून पल्लवी वाघ केळकर, संजीव तांडेल, सागर खेडेकर, वैदेही करमरकर, दिनेश रिकामे, क्षितीज भंडारी, तन्वी ठाकूर आणि विशाखा महेश सुभेदार यांनी काम केले आहे. या नाटकाची मूळकथा : इम्तियाज पटेल, लेखक, दिग्दर्शक : संतोष पवार, निर्माता : नितीन भालचंद्र नाईक, नेपथ्य : संदेश बेंद्रे, प्रकाश अमोघ फडके, संगीत : जितेंद्र कुलकर्णी, गीते : नचिकेत जोग, संतोष पवार, वेशभूषा : अर्चना ठावरे-शहा, नृत्ये : सोनिया परचुरे, सूत्रधार : दिपक गंगाधर जोशी असणार आहेत.
सध्या आई कृष्णादेवीच्या या उत्सव सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी ग्रामस्थ, युवक मंडळातील सदस्य मेहनत घेत आहेत. तरी, मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन गावप्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, भजन मंडळ अध्यक्ष अल्पेश म्हात्रे, उपाध्यक्ष अंजेश घरत, महिला मंडळ अध्यक्ष प्रमिता पाटील यांनी केले आहे.
