एचआयव्हीविरोधात लढा अपयशी

12 वर्षात रायगडात 3,843 रुग्ण; 1,782 रुग्णांचा मृत्यू

| रायगड | सुयोग आंग्रे |

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर, औद्योगिक विकासाचा वाढता आलेख , पर राज्यातील वाढते नागरीकरण यामुळे रायगड जिल्हा देशाचे आर्थिक केंद्रबिंदू बनू पाहत आहे. ही जमेची बाजू असली तरी एचआयव्हीच्या विषाणूचा प्रसार होण्यात देखील जिल्हा अग्रेसर आहे. रायगड जिल्ह्याच्या एचआयव्ही बाधितांचाआकडा लक्षवेधी आहे. गेल्या बारा वर्षात 3 हजार 843 रायगडकरांना एचआयव्ही विषाणूची लागण झाली. तर 1 हजार 782 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग एचआयव्हीविरोधातलढा देण्यासाठी सज्ज आहे. आरोग्य विभागाने समुपदेशन आणि उपचारपद्धतीसाठी कंबर कसली असतानाही केवळ पॉझिटिव्ह रुग्णांच्या नकारात्मक विचारांमुळे एचआयव्हीला आळा बसवण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 2002 पासून एचआयव्ही बाधितांची तपासणी आणि उपचापद्धती सुरु करण्यात आली. त्यापूर्वी ही तपासणी मुंबईमध्ये केली जात होती. एचआयव्ही विरोधात सक्षम लढा उभारण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 14 स्टॅन्ड आलोन आयसीटीसी, एक मोबाइल आयसीटीसी व्हॅन, तीन टेस्ट पीपीपी, 63 एफआयसीटीसी प्राथमिक आरोग्य केंद्र, 123 एफआयसीटीसी पीपीपी, तीन एआरटी केंद्र , तसेच 11 लिंक एआरटी केंद्र, एक डीएसआरसी केंद्र, पाच रक्तपेढी, तीन एनजीओ, एक सीएससी केंद्र आणि आठ लिंक वर्कर कार्यरतआहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात एचआयव्ही बाधितांचे आणि अन्य जनतेला काळजी समर्थन आणि उपचार करण्यावर भर दिला गेला आहे.

रायगड जिल्ह्यतसन 2014 ते 2023 या दहा वर्षांच्या कालावधीत सर्वसाधारण आणि गरोदर मतांची एचआयव्ही पूर्व निदान चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये 14 लाख 75 हजार 12 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 10 लाख 651 सर्वसाधारण आणि चार लाख 74 हजार 361 गरोदर मतांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सर्वसाधारणमध्येतीन हजार 532 तर गरोदर मातांमध्ये 164 महिला असे एकूण तीन हजार 696 एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले आहे. तर जिल्ह्याच्या 12 वर्षाच्या एचआयव्ही प्रगती अहवालात तब्बल एक हजार 782 नागरिकांचा मृत्य झाला आहे.

रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व आयसीटीसीमार्फत एचआयव्ही तपासणी बरोबरच व्हीडीआरएल, एचबीएस्सी, एचसीव्ही तपासण्या केल्या जातात. सध्यस्थितीत व्हीडीआरएल, एचबीएस्सी, एचसीव्ही किटची कमतरता आहे. एचबीएस्सी, एचसीव्ही किट एनएचएम अथवा इमरजेंसी फंड यामधून मिळविणेकरीता प्रस्ताव पाठविण्याचे प्रस्तावित आहे. व्हीडीआरएलची तपासणी हि जनरल लॅब किंवा एचएलएल यांच्या मार्फत करण्याचे विचाराधीन आहे.ट्रान्सजेन्डरकरिता प्रत्येक सरकारी रूग्णालयामध्ये पाच खाटांची एक खोली, स्वतंत्र स्वच्छतागृह व बाथरूम उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे संजय माने यांनी सांगितले.

बालके पॉझिटिव्ह आल्यास त्यांना एआरटी उपचार चालू केले जातात. रायगड जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून आलेल्या बाळांची सुद्धा डीबीएस तपासणी केलीजाते. रायगड जिल्ह्यातील सर्व बालके निगेटिव्ह आलेले असून प्राथमिक अवस्थेत पालकांकडून बालकाला होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यामध्ये शासनाला 100 टक्के यश आले आहे. एचआयव्ही बाधित रुग्ण उपचार घेण्यामध्ये हलगर्जीपणा करतात. काही रुग्ण अर्धवट उपचार घेतात. यामुळे एचआयव्हीचे प्रमाण कमी होण्यास विलंब लागत आहे.

संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग

Exit mobile version