ऑलिव्ह रिडलेचे अखेर आगमन

। राजापूर । वृत्तसंस्था ।
अवकाळी पाऊस, प्रतिकूल हवामान आदींमुळे ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अंडी घालण्यासाठी तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर येणार का, याची सार्‍यांना उत्सुकता आता संपली आहे. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे समुद्र किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आगमन झाले असून, वेत्ये येथे कासवाची रविवारी (ता. 2) तब्बल 61 अंडी सापडली आहेत. कासवमित्र गोकुळ जाधव यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली किनार्‍यावर घरटे करून योग्यपद्धतीने संवर्धन केले आहे. कासवांनी नववर्षाच्या शुभारंभाला दिलेल्या या सुखद धक्क्याने पर्यावरणप्रेमींसह वेत्येवासीय आणि पर्यटक सारेच सुखावले आहेत.
वेत्ये किनार्‍यावर कासवाच्या अंड्याचे संवर्धन करणारे यावर्षीचे पहिले घरटे झाले आहे. या अंड्यामधून आता सुमारे पंचावन्न दिवसांनी पिल्ले बाहेर येणार आहेत. प्रतिकूल हवामानामुळे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे आगमन लांबले. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कासवांनी किनारपट्टीवर येवून सार्‍यांना सुखद धक्का दिला आहे. वेत्ये समुद्र किनारी पहाटेच्या दरम्यान फेरफटका मारत असताना कासवमित्र जाधव यांना कासवांची अंडी आढळून आली. त्यांनी याबाबत तत्काळ राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. त्यानंतर किनार्‍यावरील वन्यप्राणी वा जंगली श्‍वापदापासून त्या अंड्याचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन केले.

Exit mobile version