चीगर किड्याच्या चाव्यामुळे होणारा आजार; आरोग्य यंत्रणा सतर्क
| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात स्क्रब टायफस या आजाराचा पहिलाच रुग्ण महाड तालुक्यातील दासगाव येथे आढळून आल्याने जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. चिगर जातीच्या सूक्ष्म किड्याच्या चाव्यामुळे होणारा हा आजार संसर्गजन्य किंवा जीवघेणा नसला, तरी जिल्ह्यात पहिल्यांदाच रुग्ण सापडल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यात आली आहे.
दासगाव येथील 72 वर्षीय महिला गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला आणि अंगदुखीने त्रस्त होती. ही महिला सध्या उरण येथे मुलाकडे राहत असून, तेथे तपासणी दरम्यान स्क्रब टायफसचे निदान झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ही बाब दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निदर्शनास आणण्यात आली. माहिती मिळताच आरोग्य पथकाने तत्काळ संबंधित महिलेच्या दासगाव येथील घराला भेट देऊन पाहणी केली.
आरोग्य पथकाने घर व परिसराची स्वच्छता करून आजूबाजूला वाढलेले गवत, रोपटी व वनस्पती काढून टाकल्या. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावडर फवारणी करण्यात आली, अशी माहिती आरोग्य सहाय्यक तुकाराम कापडे यांनी दिली. घरा शेजारील परिसर व संपूर्ण गावात अशा लक्षणांचे इतर रुग्ण आहेत का, याचीही तपासणी करण्यात आली; मात्र सध्या अन्य कोणताही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. सद्यस्थितीत संबंधित महिलेवर पनवेल येथे उपचार सुरू आहेत.
योग्य उपचाराची गरज
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत बिरादार यांनी सांगितले की, हा आजार जीवघेणा नसला तरी जिल्ह्यात पहिल्यांदाच रुग्ण आढळल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही; मात्र परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. स्क्रब टायफस हा ओरिएंटिया त्सुसुगामुशी या परजीवीमुळे होतो. माइट्स किंवा चिगर्स नावाच्या सूक्ष्म कीटकांच्या चाव्याद्वारे हा आजार पसरतो. ताप, डोकेदुखी, थंडी वाजणे, अंगदुखी व कधी कधी पुरळ अशी लक्षणे दिसून येतात. रक्ततपासणी किंवा पीसीआर चाचणीद्वारे निदान केले जाते आणि योग्य वेळी अँटीबायोटिक्स उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.







