रत्नागिरीत डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे पहिला मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत 80 वर्षांची महिला संगमेश्‍वरमधील रहिवासी होती. डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतरही आजार होते. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या माहितीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला.

राज्यात सध्या डेल्टा व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. डेल्टा व्हेरियंटमुळे एक रुग्ण दगावला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट बाबतीत सध्या तरी मोठ्या प्रमाणावर रुग्ण नाहीत, असं ते म्हणाले. डेल्टा व्हेरियंट बाबतीत सध्या 36 जिल्ह्यामधून नमुने घेण्याचे काम सुरू असून केंद्रीय संस्था पलवल ही राज्य सरकारला मदत करत आहे. सध्या तरी राज्यात कुठलेही निर्बंध लागणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात 21 रुग्ण
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने चिंता वाढवली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ अद्याप झालेली नाही. हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

Exit mobile version