तीन दिवसीय रहिवासी प्रशिक्षण; पन्नास शेतकऱ्यांचा सहभाग
| रायगड | प्रतिनिधी |
पाणी फाऊंडेशन, रायगड जिल्हा कृषी विभाग, आत्मा विभाग व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप 2026 अंतर्गत कोकण विभागातील पहिल्या तीन दिवसीय रहिवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप बुधवारी (दि.7) माणगावातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या सभागृहात उत्साही वातावरणात पार पडला. या प्रशिक्षण शिबिरात एकूण 50 महिला व पुरूष शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
‘फार्मर कप 2026’ ही स्पर्धा पाणी फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. याचा उद्देश राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेती उत्पादन वाढवणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या स्पर्धेत यंदा रायगड जिल्ह्यानेही सहभाग घेतला असून स्पर्धा जिंकण्यासाठी शासन व शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याची प्रथम निवड करून एकूण 50 महिला व पुरूष शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे शिबीर 5 ते 7 जानेवारीदरम्यान पार पडले. शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गट शेती व स्मार्ट शेती या संकल्पनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.
मार्गदर्शन करताना सुनील बोरकर यांनी शेती क्षेत्रातील बदल स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. कायम शिकण्याची भूमिका ठेवणारा, नवीन बदल स्वीकारणारा आणि एकत्र येऊन शेती करणाराच यशस्वी होतो. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीत प्रयोगशीलता ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशन शेतकऱ्यांमध्ये उत्साह आणि आशा निर्माण करण्याचे कार्य करत असून, अशा प्रशिक्षणातून शेती क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच, त्यांनी विविध उदाहरणे व बोधकथांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
यावेळी आत्मा विभाग संचालक सुनील बोरकर, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, पाणी फाऊंडेशनकडून प्रमुख मार्गदर्शक नामदेव ननावरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे व उमेद जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्ह्याचा सहभाग
फार्मर कप 2026 ही स्पर्धा पाणी फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. याचा उद्देश राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेती उत्पादन वाढवणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यानेही यावर्षी सहभाग घेतला असून स्पर्धा जिंकण्यासाठी शासन व शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याची प्रथम निवड करून एकूण 50 महिला व पुरूष शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.






