खा. बारणेंनी बनवलेला पहिला रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

आमचा रस्ता पक्का कधी होणार?

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भागूची वाडीमध्ये जाण्यासाठी वन विभागाची परवानगी घेऊन रस्ता बनविला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्या रस्त्याबाबत मोठा बोलबाला करण्यात आला होता. मात्र, आज चार वर्षांनंतरदेखील त्या रस्त्यावर डांबर काही पडली नाही. दरम्यान, खासदार बारणे यांनी कच्चा रस्ता बनविला, पण पक्का रस्ता काही बनविला नाही, अशा भावना भागुचीवाडी ग्रामस्थांच्या आहेत.

मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कळंब ग्रामपंचायतीमध्ये भागुची वाडी ही आदिवासी वाडी आहे. मुख्य रस्त्यापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर ही आदिवासी वाडी एका डोंगरावर वसली आहे. शंभरहून अधिक घरांची लोकवस्ती असलेल्या या वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता. वनजमिनीतून रस्ता बनविण्यासाठी या भागाचे खा. श्रीरंग बारणे यांनी वन विभागाची परवानगी आणली आणि भागूची वाडी येथे जाण्यासाठी रस्ता बनविला गेला. डोंगर फोडून लाल मातीतून रस्ता बनविण्यात आल्यानंतर खडीकरण कामासाठी 40 लाखांचा निधीदेखील खासदारांनी मंजूर करून घेतला. त्या निधीमधून खडीकरण करून झाल्यावर वाहने भागुची वाडीमध्ये जाऊ लागली. पण त्यानंतर रस्त्यावर डांबरीकरण होईल या आशेवर राहिलेल्या ग्रामस्थांना चार वर्षांत आश्‍वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. डोंगर भाग असल्याने तीव्र चढाव असा बनविण्यात आलेल्या रस्त्यावर करण्यात आलेले खडीकरण केलेला रस्ता पावसात खराब होत असतो. पावसाचे पाणी हे वाडीमधून आणि डोंगरातून रस्त्याने वाहत खाली येत असते आणि त्यामुळे खडीकरणासाठी वापरलेली पावसाच्या पाण्यासोबत खाली घरंगळत गेली आहे, तर काही खडी हे रस्त्याच्या आजूबाजूला निघून गेली आहे.

खासदार झाल्यानंतर श्रीरंग बारणे यांनी वन विभागाची परवानगी आणून भागुची वाडी येथे जाण्यासाठी रस्ता बनविला. त्यामुळे तालुक्यातील अनेक प्रलंबित रस्त्यांना आलेला वन विभागाचा अडथळा दूर होईल असे वाटले होते. मात्र भागूची वाडीमधील रस्ता आजही पक्का रस्ता बनलेला नाही. त्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी खासदार यांच्याकडून निधी दिला गेला नाही आणि त्यामुळे तेथील आदिवासी लोकांच्या नशिबी आजही कच्चा रस्त्यातून चालण्याची करावी लागणारी कसरत कायम आहे.

चार वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या रस्त्यावर डांबरीकरण केले नाही आणि त्यामुळे दगड बाहेर निघून वाहने चालवणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना बोरीची वाडी येथून ओलमन भागातून वाहने घेऊन जावे लागत आहे. हा फेरा किमान 8 किलोमीटरचा असून, रस्त्याचे डांबरीकरण झाले असते तर तेच आदिवासी लोक अवघ्या दोन मिनिटात वाडीमधून खाली मुरबाड रस्त्यावर आले असते. परिणामी, कच्चा रस्ता हा आदिवासी लोकांसाठी काही कामाचा नाही, अशी चर्चा निवडणूक काळात सुरू आहे.

Exit mobile version