कोळी बांधव आर्थिक संकटात; मासळी उत्पादन घटल्याने फटका
| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेले डिझेलचे दर, समुद्रातील प्रदूषण, बदलते हवामान आणि अनधिकृत मासेमारी यांचा दुहेरी-तिहेरी फटका बसत असल्याने मुरुड परिसरातील कोळी बांधवांवर आर्थिक संकट ओढवले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, नेहमीच्या वेळेपेक्षा तब्बल एक महिना आधीच अनेक मच्छिमारांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर ओढून ठेवल्या आहेत.
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार सतत अडचणींचा सामना करत आहेत. पावसाळ्यातील अनियमित पाऊस, वादळी वारे, तसेच समुद्रातील वाढते रासायनिक प्रदूषण यामुळे मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. कारखान्यांमधून सोडले जाणारे विषारी द्रव्य समुद्रात मिसळल्याने मासळी उत्पादन घटले असून, याचा थेट फटका पारंपरिक मच्छिमारांना बसत आहे.
यातच सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाणेच परवडेनासे झाले आहे. खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र घटत चालल्याने कोळी बांधव अक्षरशः दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहेत.
मच्छिमारांसाठी वर्षभरात साधारण सहा हंगाम महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी पावसाळ्यानंतरचा गणपतीचा हंगाम हा सर्वात मोठा आणि उत्पन्न देणारा काळ असतो. कारण, पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या बंद काळात माशांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, अलीकडे या बंद काळातही एलईडी लाईटच्या सहाय्याने होणारी अनधिकृत मासेमारी वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांना मुख्य हंगामात अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नाही. पुढील उर्वरित हंगामांमध्येही बदलत्या हवामानामुळे मासेमारी अनिश्चित झाली आहे. त्यामुळे कोळी बांधवांना कसाबसा उदरनिर्वाह करावा लागत आहे.
मुरुड येथे अद्याप सुसज्ज मासेमारी जेट्टीची सुविधा नसल्याने बोटी वाळूत उभ्या कराव्या लागतात. यामुळे बोटींचे नुकसान, अपघात आणि दुरुस्तीचा खर्च वाढतो. तातडीच्या दुरुस्तीच्या सुविधांचा अभाव असल्याने किनाऱ्यावर बोटी ओढल्यानंतरच त्यांची दुरुस्ती करावी लागते.
दरम्यान, समुद्रात जाणे शक्य नसल्याने काही कोळी बांधव किनाऱ्यावर ‘रापण’ पद्धतीने मासेमारी करत आहेत. यात आठ ते दहा जण मिळून जाळे टाकून किनाऱ्यावर मासे ओढले जातात. मात्र, या पद्धतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असून, त्यावर कुटुंबाची गुजराण करणे कठीण झाले आहे. काही जण तर मजुरीकडे वळले असून, महिलाही रोजगारासाठी बाहेर पडत आहेत.
एकूणच, वाढता खर्च, घटते उत्पन्न, प्रदूषण, अनधिकृत मासेमारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे कोळी बांधवांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीस जबाबदार कोण?, असा सवाल आता मुरुडमधील मच्छिमार उघडपणे विचारत आहेत.





