मच्छीमारांची बोट पलटली; तीन जण बुडाले, एक बचावला

। मालवण । प्रतिनिधी ।

मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली जनता जनार्दन मच्छीमार नौका आचरा समुद्रात पलटली. ही घटना रविवारी (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला तर एक मच्छिमार पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी ठरल्याने बचावला. ऐन नारळी पौर्णिमेला झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्जेकोट व हडी गावासह मच्छिमार बांधवांवर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये पातीचे मालक सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे व्हाईसचेअरमन गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर यांचा समावेश आहे. आडकर हे चौके हायस्कुलमधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. तर हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे (65) व प्रसाद भरत सुर्वे (32) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत (53) रा. मोर्वे देवगड हे पोहत किनर्‍यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला असून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

दरम्यान, सकाळच्या सुमारास दुर्घटनेतील मच्छिमारांचे व्यांगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दोघांचे मृतदेह आढळून आले. दुर्घटना घडल्याचे समजताच आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, आचरा पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, तुकाराम पडवळ, सुदेश तांबे, मिलिंद परब, मनोज पुजारे अमित हळदणकर विशाल वैजल तसेच मच्छिमार समितीचे छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, विकी तोरसकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, वसंत गांवकर, ढोले बाबू तसेच सर्जेकोट, हडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल झाले होते.

Exit mobile version