। हमरापूर । वार्ताहर ।
कोकणाचे प्रवेशदार असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल आता पथदिव्यांनी उजळणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणात व गोवापर्यंत जाणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. तसेच जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर गणपतीपुळे, रत्नागिरी, मालवण, तारकर्ली बीच, सिंधुदुर्ग तसेच गोवापर्यंत फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पेण तालुक्यात व जिल्ह्यात बर्याच ठिकाणी औद्योगिक कंपन्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूकदेखील या महामार्गावरून होते. त्यामुळे या महामार्ग वाहनांची सतत गर्दी असते. परंतु हा महामार्ग पूर्वी एकपदरी असल्याने या महामार्ग सतत अपघात होत होते व वाहतूक कोंडीदेखील सातत्याने होत असे. त्यामुळे प्रवाशांना फार त्रास होत होता.
या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे अशी मागणी करत अनेक आंदोलने केली व आजही सुरू आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुरु केले. हे काम गेल्या 14 वर्षापासून सुरू आहे.
सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महामार्गावर पथदिवे नसल्याने बर्याच वेळा वाहन चालकांना वाहन चालताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे बर्याचदा अपघातदेखील झाले आहेत. त्यामुळे आता महामार्गांवर पथदिवे लावले जात असून प्रथम महामार्गावरील उड्डाणपूलांवर सध्या पथदिवे लावण्याचे काम सुरू असून त्याचे पोलदेखील उभारण्यात आले आहेत.
पनवेल पासून पळस्पे, तुरमाळे, तारा, खारपाडा पूल, बाळ गंगा नदी पूल, तरणखोप बायपास, भोगावती नदी पूल, पशुसंवर्धन ते रामवाडी पूल, उचेडा ते वडखळ, डोळवी बायपास पूल ते नागोठणेपासून पुढे विजेचे पोल उभारण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच महामार्ग पथदिव्यांनी उजाळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.