मागील दहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित; शासनाच्या नियोजनशून्यतेचा बसतोय फटका
। चिरनेर । वार्ताहर ।
आपल्या उमेदीच्या काळात ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाचे मनोरंजन करणार्या लोककलावंतांना आयुष्याच्या संध्याकाळी चार घास खाता यावेत यासाठी राज्य शासनाकडून मानधन देण्यात येत आहे. परंतु, हे मानधन दर महिन्याला न मिळता कधी चार, तर कधी सहा महिन्यांनी एकदमच मिळत असल्यामुळे वृद्ध कलावंतांची महिनाअखेरीस ओढाताण होत आहे. लोककलावंत व त्यांच्या वारसांना शासनाकडून दरमहा 2250 रुपये मिळणारे मानधन मागील दहा महिन्यांपासून न मिळाल्याने जिल्ह्यातील 785 वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
राज्यभरातील हजारो लोक कलावंत तमाशा, नाटक, भारुड, लावणी, कीर्तन, शाहिरी पोवाडे, पोतदार अशा सर्व लोककला मोठ्या खुबीने आणि उत्तम प्रकारे सादर करतात . त्या त्या प्रसंगाचे आणि कलेचे औचित्य त्यात साठविलेले असते. या सार्या लोककलांमध्ये नुसतेच मनोरंजन होत नसते, तर त्यात समाजाचे भावनिक संबंध जोडलेले आहेत.
समाजातील चांगल्या चालीरीती, रीतीरीवाज यांची भलावणच केलेली असते. त्या लोकांच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत. एकंदरीत मनोरंजनाच्या दृष्टीने या लोककलावंतांना फार महत्त्व आहे. त्यामुळे शासन या लोककलावंतांना मानधन देत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे मानधन या लोककलावंत व त्यांच्या वारसांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. मात्र, रायगड जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना व त्यांच्या वारसांना मागील दहा महिन्यांपासून मानधन मिळणे बंद झाले असल्यामुळे त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष घालून त्यांना चार महिन्यांतून तर कधी सहा महिन्यातून एकदम मिळणारे मानधन हे प्रत्येक महिन्याला या वृद्ध कलावंतांच्या बँक खात्यात जमा केले तर त्यांना फार मोठी ओढाताण करावी लागणार नाही. मा,त्र हे मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे हे कलावंत हवालदिल झाले असून, त्यांची अवस्था फार बिकट झाली आहे.
जिल्ह्यातील लोककलावंताना मागील दहा महिन्यांपासून मानधन मिळणेच बंद झाले असल्यामुळे या वृद्ध कलावंतांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. यातील काही वृद्ध कलावंतांकडे घरातील नातेवाईक फारशे लक्ष देत नसल्यामुळे त्यांना आर्थिकतेचा मोठा सामना करावा लागत आहे. उतरत्या वयात त्यांना औषध गोळ्यांची गरज भासत असताना त्यांना मिळणारे हे मानधन वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना विविध आजारांच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. शासनाने या वृद्ध कलावंतांचा जास्त अंत न बघता तातडीने त्यांच्या बँक खात्यात मानधन जमा करावे, अशी मागणी वृद्ध कलावंतांकडून केली जात आहे.