वनविभागाकडून नागरिकांची जनजागृती
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील बाजारपेठ येथे रस्तावरील जाहीद फकजी यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरेत बिबट्याचा मुक्त संचार करताना आढळून आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यांचे सहकारी वनपाल व वनरक्षक याठिकाणी येऊन परिसराची पाहणी केली असता दुकानाच्या काही अंतरावर बिबट्यासारख्या प्राण्याच्या पाहुल खुणा त्या परिसरात दिसून आल्या. त्यामुळे त्यांनी शोध मोहिम तीव्र करून रात्रीच्या वेळी वनपाल व वनरक्षक असे 12 जणांची टीम गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले. तसेच नागरिकांना वनविभागाकडून खबरदारीचे पत्रक वाटप करुन नाक्या नाक्यावर पत्रके चिटकवली जात आहेत.
बिबट्या पकडण्यासाठी रोहा वनविभागाकडुन रेसस्क्यू व्हॉन मागवली असून त्याबरोबर मुरुडवनविभागाचे कर्मचारी मुरुड शहर, तेलवडे, शिघ्रे, एकदरा, डोंगरी मजगांव, खोकरी आदीसह जगंलाला लागून असणाऱ्या गावापर्यंत 12 जणांची टीम गस्त घालत आहे. यामध्ये महिला वनरक्षक ही काम करत आहेत. तरी नागरिकांनी खबरदारीचे उपाय म्हणून सुर्यास्तांनंतर शक्यतो घराबाहेर पडु नये, गटा-गटाने, काठी व बॅटरी घेऊन बाहेर पडावे, रात्री कुत्रे जोरजोराने भुकंत असल्यास जवळपास बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा घरातच सुरक्षित रहावे, शेळ्या, कोंबड्या व गाय-म्हैस पाळीव प्राणी बंद गोठ्यात ठेवावे, अफवांवर विश्वास ठेऊ नका, अफवा पसरवु नका, आपल्या पाळीव जनावरांना एकटे चरायला सोडु नका, बिबट्या दिसल्यास डबे वाजवून फटाके किंवा मोठं मोठ्याने आरडा ओरड करावा. बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागास सुचित करावे.असे आवाहन मुरुडचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
शहरातील जेवढे रस्तावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता कुठल्याच कॅमेरात बिबट्या दर्शन कोणालाच दिसुन आले नाही.तरी शहरातील व पंचक्रोशी भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
-प्रियांका पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी