आदिवासी कुटुंबांना गॅस कनेक्शन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बेकरेवाडी आणि आसलवाडीमधील आदिवासी कुटुंबांना गॅस शेगडी आणि गॅस सिलिंडरचे वाटप वन विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. कर्जत तालुक्यात जंगल राखले जावे यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू असून, या दोन आदिवासीवाड्यांमधील 21 कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले.
कर्जत पश्चिम वन विभाग यांच्या माध्यमातून या दोन्ही आदिवासीवाड्यांमध्ये गॅस जोडणी देण्यात आली. कर्जत पश्चिम वन विभागाचे वनक्षेत्रपाल समीर खेडकर आणि माथेरान वन क्षेत्रपाल उमेश जंगम यांच्या उपस्थितीत या सर्व कुटुंबांना गॅस सिलिंडर आणि गॅस शेगडी भेट देण्यात आली.
माथेरानच्या डोंगरातील या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्तादेखील नाही आणि अशा दोन-दोन आदिवासीवाड्यांना वनपरिक्षेत्र कर्जत पश्चिम वन परिमंडळकडून गॅस वाटप देऊन आदिवासी समाजात जंगल रक्षणाचे बीज लावण्याचा प्रयत्न केला. अतिदुर्गम भाग असल्यामुळे या भागात आदिवासी समाज आहे. त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून गॅस जोडणी देण्यात आली. त्याचवेळी आगामी काळात आणखी गॅस जोडणी देण्यात येईल, असे वन क्षेत्रपाल खेडकर यांनी बेकरेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात स्पष्ट केले. याप्रसंगी आदिवासी समाजाचे कार्यकर्ते जैतू पारधी, गणेश पारधी, वनपाल नारायण माने, वनरक्षक जितेंद्र चव्हाण, वाघमोडे, अधेवाड आदी उपस्थित होते.