स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप; जंगल वाचवण्यासाठी योजना केवळ कागदी
| महाड | प्रतिनिधी |
तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू असून, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासन एकीकडे पर्यावरण संरक्षण, हरित विकास आणि वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना प्रत्यक्षात मात्र जंगलतोडीवर प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही. अवैध वृक्षतोड, जंगलातील लाकूड चोरी आणि डोंगरकपारी फोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
विशेष करून हे सर्व प्रकार महाड तालुक्यातील नाते विभाग तसेच विन्हेरे विभागात सर्रासपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रकारांकडे वनविभागाकडून जाणूनबुजून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हे वन अधिकारी जे शेतकरी आजही चुलीवर जेवण बनवतात ते घरी जाळण्यासाठी नेत असलेल्या गाड्या पकडून त्यांच्यावर विनाकारण दंडात्मक कारवाई करत आहेत खरे जंगल तोड करणारे नाते, वरडोली, कोतुर्डे, आदी विभागांत खैर, किटा मोठ्या प्रमाणात जंगलतोड करत आहेत त्यांच्याकडे अक्षरशः कानाडाला करत आहेत.
रात्रीच्या वेळी जंगलात मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असून, सकाळपर्यंत लाकूड वाहतूक केली जाते.अनेक ठिकाणी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने वनमाफियांचे मनोबल वाढले आहे. काही भागांत तर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत असल्याचीही चर्चा आहे. जंगल वाचवण्यासाठी केवळ कागदी योजना नव्हे तर कठोर कारवाईची गरज आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवून जंगल संरक्षण समित्या सक्षम करणे आवश्यक आहे. शेवटी प्रश्न एकच आहे. जंगलतोड कधी थांबणार आणि वनविभाग कधी जागा होणार?
पर्यावरणाचा समतोल ढासळा
जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पावसाळ्यात दरडी कोसळणे, पाणीटंचाई, तापमानात वाढ आणि जैवविविधतेचे नुकसान असे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. भविष्यात याचे परिणाम अधिक भयावह असतील, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.







