जॅकलीन विल्यम्स यांनी पाहिले पंचांचे काम
| मुंबई | प्रतिनिधी |
महिलांच्या सामन्यांसाठी पुरुष पंच असणे नवीन नाही, पण आता पुरुषांच्या सामन्यांसाठी महिला पंचांची नियुक्ती होण्यास सुरुवात झाली आहे. हे केवळ कोणत्या जाहिरातीत घडलेले नाही, तर प्रत्यक्ष सामन्यांत घडले आहे. इराण महिलांसाठी पुरुषांच्या फुटबॉल सामन्याचे दरवाजे खुले करीत असताना जॅकलीन विल्यम्स यांनी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 लढतीसाठी मैदानावरील पंच म्हणून काम पाहिले. एवढेच नव्हे तर, फुलहॅम आणि बर्नली यांच्यात 23 डिसेंबरला होणाऱ्या प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीसाठी रेफरी म्हणून रेबेका वेल्श यांची नियुक्ती झाली होती.
वेस्ट इंडिज नव्या वर्षात होणाऱ्या वर्ल्ड कप टी-20 स्पर्धेचे मुख्य यजमान आहेत. तिथेच सुरू असलेल्या वेस्ट इंडिज-इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेसाठी जॅकलीन यांची नियुक्ती झाली होती. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्यावेळी मैदानावर असलेल्या त्या महिला पंच आहेत, पण आपण शेवटच्या नसणार याची जॅकलीन यांना खात्री आहे. एवढेच नव्हे तर, माझ्यानंतर पुरुषांच्या सामन्यांसाठी नियुक्त होणाऱ्या महिला पंच अधिक प्रभावी कामगिरी करतील, असाही त्यांना विश्वास आहे. माझी नियुक्ती पाहून अधिकाधिक मुली खेळण्यास सुरुवात करतील, अशी अपेक्षा त्या व्यक्त करीत आहेत.
रेबेका या प्रीमियर लीगमधील पहिल्या महिला पंच असतील. 1990 मध्ये सहाय्यक म्हणून महिलांनी काम पाहिले आहे. मात्र, लीगच्या इतिहासात प्रथमच एका महिलेकडे संपूर्ण सामन्याची सूत्रे असतील. गेल्या महिन्यात रिबेका यांची चौथ्या सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली होती. आता त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रिबेका कमालीच्या शांत आहेत. सामन्यांवर त्यांचे चांगले नियंत्रण असते. त्या सामन्यांचे योग्य विश्लेषण करीत असतात, त्यामुळे त्यांचे निर्णय योग्य असतात. काही वर्षांत त्यांच्यात वेगाने प्रगती झाली आहे, असे प्रीमियर लीगच्या पंच समितीचे प्रमुख होवार्ड वेब यांनी सांगितले. प्रीमियर लीगमध्ये रिबेका या प्रथमच रेफरी असल्या तरी त्यांना या कामाचा चांगलाच अनुभव असल्याचे समोर आले आहे.