हेटवणे धरणाचे चार दरवाजे दोन फुटांनी उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पेण तालुक्यातील हेटवणेे धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे 2 फुटांनी उघडल्यानेे खाडी व नदीकिनारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची एकूण क्षमता 147 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सदरचे धरण मागील पाच ते सहा दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे 87 टक्के भरले आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी सदर धरणाच्या 6 दरवाजांपैकी 4 दरवाजे 2 फुटांनी उघडल्यानेे खाडी व नदीकिनारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेटवणे धरणाचे दरवाजे 6 मीटरचे आहेत ते केवळ 2 फुटांनी उघडण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे गरजेचे आहे. सदर दरवाजे केवळ सावधानता बाळगणे करिता उघडण्यात आले आहेत. केवळ दोन फुटांनी धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे अशी माहिती हेटवणे धरणाचे कार्यकारी अभियंता एस.बी. जाधव व कनिष्ठ अभियंता आकाश ठोंबारे यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर पेण तहसील कार्यालयातून खाडी व नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूरसदृश्य गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे तलाठी, सर्कल व इतर महसूल कर्मचाऱ्यांना सरपंच व ग्रामस्थांच्या संपर्कात राहून मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती पेणच्या तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी दिली.

Exit mobile version