15 हेक्टर खाजण क्षेत्रावर खारफुटी वाढली; मच्छिमार विरुद्ध पर्यावरणवाद्यांमध्ये संघर्ष
| चिरनेर | प्रतिनिधी |
जेएनपीएच्या चौथ्या खासगी बंदराच्या विस्तारामुळे एकीकडे देशातील सर्वात मोठे बंदर कार्यान्वित झाले असले, तरी दुसरीकडे पारंपरिक मच्छिमारांचे खाजण क्षेत्र आणि पर्यावरण संवर्धन यांचा गंभीर संघर्ष उभा राहिला आहे. चौथ्या बंदराच्या विस्तारासाठी सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावर दगड-मातीचा भराव टाकण्यात आला. यापैकी 15 हेक्टर क्षेत्रावर चिखलाचे मोठे डोंगर तयार होऊन तेथे मोठ्या प्रमाणावर खारफुटीची झाडे उगवली आहेत. त्यामुळे जेएनपीए अडचणीत आली आहे.
जेएनपीएने 11284 कोटी रुपये खर्चून चौथ्या बंदराचा विस्तार केला आहे. हे चौथे बंदर देशातील सर्वात मोठ्या लांबीचे ठरले आहे. मात्र, या क्षेत्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जात होती. मात्र, चिखलाचे डोंगर आणि खारफुटीच्या वाढीमुळे मच्छिमारांचे खाजण क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. त्यामुळे या 15 हेक्टर क्षेत्रावरील चिखलाचे डोंगर हटवून क्षेत्र सपाट करण्याची मागणी जेएनपीए कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, या क्षेत्रात उगवलेली खारफुटी ही दुर्मिळ व पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असल्याने ती तोडल्यास पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होईल, अशी भीती व्यक्त करत पर्यावरणप्रेमी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. खारफुटी नष्ट झाल्यास जैवविविधतेवर, किनारपट्टी संरक्षणावर आणि हवामान संतुलनावर विपरीत परिणाम होणार असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. मच्छिमारांची उपजीविका वाचवायची की दुर्मिळ खारफुटीचे संवर्धन करायचे, या दोन परस्परविरोधी मागण्यांमुळे जेएनपीए प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याप्रकरणी अंतिम निर्णय घेण्यासाठी जेएनपीए अध्यक्ष गौतम दयाल यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती सीजीएम जे. वैद्यनाथन यांनी दिली आहे.






