चौथ्या संशयिताला रायगडातून अटक

खवले मांजर तस्करी प्रकरण

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

खेड तालुक्यातील तळे येथे 30 जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भरणे येथील काळकाई मंदीरजवळ मुंबई-गोवा महामार्गाजवळ वनविभागाच्या पथकाने खवले मांजराची खवले विक्री करण्यासाठी आलेल्या एका टोळीतील एकाला ताब्यात घेतले होते. यानंतर खवले मांजर शिकार व खवले तस्करी प्रकरणी एकूण तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चौथा आरोपी वन विभागाच्या नजरेआड होता. गुरूवारी (दि.1) रायगड जिल्ह्यातील त्याच्या घरातून वनविभागाने त्याला अटक केली असून शनिवारी (दि.10) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी सोमवार (दि.12) पर्यंत वन कोठडीत केली होती.

खेड तालुक्यातील भरणे येथे एक व्यक्ती वन्यप्राणी खवले मांजराची खवले विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहीती मिळाल्यानुसार दापोली परिक्षेत्रातील कर्मचार्‍यांनी सापळा रचुन संबंधित तीन संशयीत आरोपींना अटक केली होती. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करून कसुन चौकशी करण्यात आली होती. चौकशीत या गुन्ह्यामध्ये सहभाग असलेल्या चौथ्या आरोपीची माहिती वनविभागाला मिळाली. चौथ्या आरोपीचा शोध रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच रायगड जिल्ह्यातही सुरुच होता. शुक्रवारी (दि.9) वनविभागाला मिळालेल्या माहीतीच्या आधारे वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी संशयित आरोपी दत्ताराम शामा कोंडके (64) रा. महाड-रायगड याला त्याच्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

दत्ताराम याला अटक करून त्याची अधिक चौकशी करून शनिवारी (दि.10) त्याला खेड येथील प्रथम वर्ग-01 न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने सोमवार दि.12 ऑगस्टपर्यंत वन कोठडीत त्याची रवानगी केली होती. दत्ताराम कोंडके हा आरोपी खुप दिवस फरार असून वन विभागाने त्याला शिताफिने पकडले होते. दत्ताराम कोंडके या आरोपीला पकडल्याने खवले मांजराची हत्या कोणी केली याची उकल करण्यास वनविभागाला मदत होणार आहे. तसेच, ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर आर. एम. रामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, खेड वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक रानवा बंबर्गेकर, अशोक ढाकणे, आदींनी पार पाडली. पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्रकाश पाटील करीत आहेत.

Exit mobile version