भविष्यकाळ महाविकास आघाडीचाच

खा. सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्‍वास
| माणगाव | प्रतिनिधी |
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड हि बेकायदेशीर होती म्हणणार्‍यांना त्यांच्या एबीपी फॉर्मवर सही कोणाची होती याचा विसर पडला असून काहींना फारसे समजत नाही, उमजत नाही, असा टोला विरोधकांना लगावत उद्याचा काळ हा आपल्या महाविकास आघाडीचाच असेल, असा विश्‍वास खा.सुनील तटकरे यांनी निजामपूर येथील सत्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त करीत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

माणगाव तालुक्यातील निजामपूर विभाग महाविकास आघाडी पुरस्कृत ग्रामपंचायत निवडणुकीतील भागाड, शिरवली, करंबेळी, कुंभे, होडगाव ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित विजयी सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा जाहीर सत्कार व मतदार बंधू भगिनी यांचा जाहीर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम निजामपूर येथे श्रीकृष्ण राईस मिलच्या समोरील पटांगणात बुधवार, दि.11 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खा. सुनील तटकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत महाविकास आघाडी सरकारने आपल्या कारकीर्दीत केलेल्या विकासकामांचा तसेच लोकाभिमुख कामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर ठेवला.

या कार्यक्रमास स्व. माजी आमदार माणिकराव जगताप यांचे सुपुत्र युवानेते श्रेयश जगताप,धनंजय जगताप,शिवसेना ठाकरे गटाचे माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, काँग्रेसचे महाड विधानसभा अध्यक्ष जनार्दन मानकर, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, महाड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, उपाध्यक्ष प्रसाद गुरव, शिवसेना माजी विभागप्रमुख अनिल मोरे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य, सदस्या, विभागातील सरपंच यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येणार्‍या सर्वच निवडणुका आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवून जिंकायचे असून, गद्दरांना त्यांची जागा दाखवून द्यायची असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी उपसभापती तुकाराम सुतार, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, युवानेते श्रेयश जगताप, शिवसेना माजी विभागप्रमुख अनिल मोरे,कुंभे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच महेश कोंडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Exit mobile version