रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

पनवेल फेरतपासणीत पिछाडीवर; श्रीवर्धन फेरतपासणीत आघाडीवर

| पनवेल | प्रतिनिधी |

मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 76.93 टक्के प्रगणक प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असताना पनवेल विधानसभा मतदारसंघात हे प्रमाण केवळ 58.53 टक्के आहे. त्यामुळे राज्यात व जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेलमध्ये फेरतपासणीची गती इतर मतदारसंघांच्या तुलनेत कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्ह्यातील 25 लाख 37 हजार 39 मतदारांपैकी 19 लाख 49 हजार 214 मतदारांच्या प्रगणक प्रपत्रांचे डिजिटायझेशन झाल्याचे एसआयआर अहवाल स्पष्ट झाले आहे. पनवेलमधील 6 लाख 84 हजार 95 मतदारांपैकी 4 लाख 399 हजार 76 प्रपत्रांचे डिजिटायझेशन झाले आहे.

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत एकूण 2790 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कार्यरत असून, सर्व बीएलओंचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 25 लाख 37 हजार 39 मतदारांसाठी 19 लाख 49 हजार 214 प्रगणक प्रपत्रांचे डिजिटायझेशन झाले आहे. त्यापैकी 19 लाख 48 हजार 752 प्रपत्रांची बीएलओंकडून पडताळणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 5 लाख 84 हजार 525 प्रपत्रे स्वीकारता न आल्याचे, तर 1 लाख 87 हजार 644 प्रकरणांमध्ये विसंगती आढळल्याचे तक्त्यात नमूद आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण 6 लाख 84 हजार 95 मतदार असून, त्यांच्यासाठी 574 बीएलओ कार्यरत होते. मतदारांची सर्व प्रगणक प्रपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

मात्र, त्यापैकी 4 लाख 399 हजार 76 प्रपत्रांचेच डिजिटायझेशन झाले असून, हे प्रमाण 58.53 टक्के आहे. बीएलओकडून पडताळणी झालेल्या प्रपत्रांचे प्रमाण 58.47 टक्के आहे. पनवेलमध्ये 2 लाख 83 हजार 700 प्रपत्रे म्हणजेच 41.47 टक्के प्रपत्रे स्वीकारता न आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच 61 हजार 168 मतदारांच्या प्रकरणांमध्ये विसंगती आढळली असून, 5 हजार 581 मतदारांच्या प्रकरणांमध्ये अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मृत मतदार (एएसडी) विसंगती नोंदविण्यात आली आहे. याशिवाय 25 हजार 453 समान वैयक्तिक तपशील असलेले मतदार (डीएसई) आणि 62 हजार 294 छायाचित्रात साम्य आढळणाऱ्या मतदारांच्या नोंदी (पीएसई) प्रकरणांची नोंद आहे.

जिल्ह्यात पनवेलनंतर उरणमध्ये 76.35 टक्के, कर्जतमध्ये 80.62 टक्के, महाडमध्ये 84.61 टक्के, अलिबागमध्ये 86.18 टक्के, पेणमध्ये 87.84 टक्के आणि श्रीवर्धनमध्ये सर्वाधिक 88.92 टक्के प्रपत्रांचे डिजिटायझेशन झाले आहे. त्यामुळे पनवेलचा टक्का जिल्ह्यात सर्वांत कमी आहे. पनवेलमधील मोठ्या मतदारसंख्येच्या तुलनेत फेरतपासणीची ही पिछाडी महत्त्वाची ठरली असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दररोज ऑनलाईन बैठकांचे सत्र सुरू ठेऊनही पनवेल पिछाडीवर राहीले. उर्वरित प्रपत्रांची पडताळणी, विसंगतींचे निराकरण आणि स्वीकारता न आलेल्या प्रकरणांवरील निर्णयानंतर मतदार यादीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version