पोलादपूर येथे इंडिया आघाडीची प्रचारसभा
| पोलादपूर | प्रतिनिधी |
सुनील तटकरेंनी लेकीसाठी गोगावलेभाऊंचे मंत्रिपदाचे ताट हिरावून घेतले. त्यामुळे तटकरेंचा गेम करण्यासाठी गोगावलेभाऊंनी फिल्डींग लावलीच असेल..! उघड लावायची अडचण असेल तर गुप्तपणे फिल्डींग लावली असेल. भरत गोगावले यांनी वरून वरून किती तटकरेंच्या प्रचाराचे नाटक केले तरी आतून तटकरे यांची ठासण्याची तयारी चालवली असणार हे नक्की आहे, अशा शेलक्या शब्दांमध्ये शिवसेनेच्या फायरब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारे पोलादपूर येथे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारसभेत कडाडल्या. तर, गद्दारांना रायगडच्या पवित्र भूमीतच गाडण्याचे काम करण्यासाठी मतदार मावळे सज्ज असल्याचे आवाहन मतदारांना करणाऱ्या शेख सुभानअली यांनीही मतदार जनतेच्या धमन्यांतले रक्त सळसळवले.
पोलादपूर येथील छत्रपती शिवाजीनगर येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या शाळेसमोरील मैदानामध्ये आयोजित इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये व्यासपीठावर महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप-कामत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष कृष्णा करंजे, सुहास मोरे, शेकापचे विधानसभा अध्यक्ष एकनाथ गायकवाड, जगन्नाथ वाडकर, शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, पद्माकर मोरे, अमित मोरे, चेतन पोटफोडे, सुशांत शेलार, ॲड. स्वीटी गिरासे, शैलेश सलागरे, पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधीगटप्रमुख नगरसेवक दिलीप भागवत, कृष्णा कदम, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, ॲड. पालकर, जाधव सर आदींची उपस्थिती लाभली.
यावेळी सुषमाताई अंधारे यांनी त्यांच्या धडाकेबाज भाषणातून सत्ताधाऱ्यांविरोधात सडेतोड टीका करताना, दुकानामंध्ये पाटी लावलेली असते, एकदा विकलेला परत घेणार नाही. तर विकलेल्या खासदार, आमदार यांना आपण परत का संधी द्यावी. गद्दारीला माफी नाही. या विकल्या गेलेल्या गद्दारांनादेखील जनता माफ करणार नाही, असे भाष्य करताना त्यांनी पुढे सांगितले, लोकांच्या मनात राग आहे. भाजपा सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता तयार करतेय; पण जनतेसाठी या पैशाचा वापर करत नाही. अंगणवाडी सेविकांना पगार, मुंबई-गोवा महामार्गासठी नाही तर आमदार, खासदार यांच्या घोडेबाजारासाठी केला जातोय, यासाठी भाजपाला गाडायचं आहे. तटकरेंच्याबद्दल मी बोलू शकते. त्यांच्या कन्या म्हणाल्या, एकत्र या चार जूनला गुलाल खेळू. मी गीते काकांचा गुलाल घेऊन येते. यापुढे रायगडातच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात रोटी, बोटी, थप्पी, बिर्याणीचे राजकारण चालणार नाही. गोगावलेभाऊंचा मुलगा अन् नारायणभाऊंची दोन पोरं ही संस्कार न झाल्याने बिघडलेल्या लेकरांची त्यांची भाषा आहे.
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात, सुनील तटकरे यांनी किती लोकांना फसवलं तरी त्यांना घरी बसवण्याचे काम जनतेच्या मताच्या ताकदीने करता येईल. 2024 मध्ये भाजपा सत्तेत आलं तर संविधान बदलण्यासाठीच येणार आहे. वन नेशन वन इलेक्शन हे फक्त हुकुमशहाला निवडण्यासाठी असून, केंद्र सरकारने सेवानिवृत्तांना पेन्शन नाही दिली, खासगी विद्यापीठ विधेयक आणले आहे. यामध्ये शैक्षणिक आरक्षण नाही, नोकरी देणे, काढून टाकणे, हे कोण करतंय असं विचारून, लोकांच्या लग्नात बुंदी वाढणाऱ्या चाळीस लोकांना खाती कशी चालवायची माहिती नाही. ड्रग्जवर केतन तिरोडकर सांगताहेत, पण फडणवीस दुर्लक्ष करीत आहेत. एक्साईज खात्याचा मंत्री देसाई सत्तारभाईकडे चुना मागतोय. यांच्या हाती आलेल्या सत्तेनंतर येडयाची जत्रा आणि कारभारी सतरा झालेत. उध्दव ठाकरे यांनी कोविड काळात जगात सर्वोत्तम काम केले, मात्र त्यांना अडचणीत आणण्याचे काम या गद्दारांच्या सत्तेकडून सुरू आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी… असे खासदार आणि आमदार तोंड उघडल्यावर सांगत आहेत. पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे, कशासाठी? 15 लाख जनतेच्या खात्यात जमा करायचे आहेत का? तरूणांना नोकऱ्या देण्याचे काम अर्धवट राहिले आहे, ते पुर्ण करायचे आहे का? मोदींची डिग्री फर्जी आहे म्हणून तरूणांना चांगले मोफत शिक्षण देण्याची इच्छा मोदींमध्ये निर्माण झाली आहे का? अशी विविध प्रश्नांची सरबराई केली.
प्रास्ताविकामध्ये तालुकाप्रमुख अनिल मालुसरे यांनी, तालुक्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता याठिकाणी गद्दारी करून आणखी वर अनंत गीते यांनी काय केले असे विचारणारे स्थानिक पुढारी हेच मुळी अनंत गीते यांच्या विकासकामांतून पोसले गेले आहेत, हे येथील जनतेला लक्षात आले आहे, असे सांगितले. ॲड. पालकर यांनी देशातील संविधानावर घाला घालण्याची भूमिका केंद्रातील सरकार घेत असल्याचे सांगून देशातील परिस्थितीचे विवेचन करीत अनंत गीते यांनाच येत्या 7 मे रोजी निवडून देण्याचे आवाहन केले. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक जाधव सर यांनी, देशातील आणि राज्यातील विकासात्मक स्थितीवर भाष्य करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी भाषणामधून अनंत गीते यांचे कार्य आणि महाड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या तसेच पोलादपूर सा.बां. उपविभागाचा भ्रष्टाचार याबाबत भाष्य केले. प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये तटकरे यांची दिवाळी जेलमध्ये जाईल, असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी कधीही त्यांची दिवाळी जेलमध्ये जाऊन दिली नाही, अशी टीकादेखील धनंजय देशमुख यांनी केली.
यावेळी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप-कामत यांनी, मोदी आणि भाजप नेत्यांच्या भाषणांतून देशाची राज्यघटना बदलण्याचे प्रयत्न 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षित बहुमत मिळाल्यास ते करतील, अशी उघड चर्चा घडवली जात असताना त्यांचे प्रयत्न उलथवून टाकण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीच्या निकाराच्या प्रयत्नांना जनतेने साथ देण्याची गरज आहे. रायगड 32 लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना येत्या 7 मे रोजी मशालीचे पहिले बटन दाबून विजयी करा, असे आवाहन केले.
गद्दारांना गाडण्यासाठी मावळे सज्ज: सुभानअली शेख सामाजिक कार्यकर्ते सुभानअली शेख यांनी आपल्या जाज्वल्य भाषणामध्ये प्रारंभी स्वत:चा परिचय करून देताना, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शाक्त पध्दतीने राज्याभिषेक करणारा मी पहिला मुस्लिम आहे, असे सांगून शाक्त राज्याभिषेकप्रसंगी आमच्या गाड्या पनवेलसह ठिकठिकाणी अडविण्यात येत असताना भाई जयंत पाटील यांनी यावेळी सहकार्य केले होते आणि आता मला इथे बोलवलं ते महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांचा हिशोब रायगडाच्या पवित्र भूमीत करण्यासाठीच, अशी सुरूवात केली. भाई जयंत पाटील यांना दिवंगत नेते माणिक जगताप यांनी तटकरे यांचा प्रचार करण्यासाठी नकार दिला तटकरे यांनी फितुरी केली, याचा बदला घेण्यासाठी आता संधी मिळाली आहे. शिवाजी महाराजांचे धोरण ‘लाख मेले तरी चालतील, पण लखांचा पोशिंदा जगला पाहिजे; पण शेतकरी ‘मेले तरी चालतील, अदानी अंबानी जगले पाहिजेत', ही सध्याची भाजपाची नीती आहे. दगाबाजी करणाऱ्यांना, गद्दारी करणाऱ्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात गर्दन मारण्याची शिक्षा होती. लोकशाहीतील गद्दारांसाठी मतदानातून शिक्षा द्यायची शपथ या मावळ्यांनी घेतली पाहिजे, असे यावेळी शेख सुभानअलि यांनी आवाहन केले. मराठी मुस्लिमांना तटकरे सोबत घेऊन काही उपयोग नाही. भरतशेठ गोगावलेच्या कार्यकर्त्यांनी फोन केला इकडे या, आम्हाला तटकरे यांनी मंत्रीपदात अडथळा केला. त्यांचा बदला घ्या. शरद पवारांना या वयात फसवलं त्यांना धडा शिकवला पाहिजे, असे यावेळी शेख सुभानअलि यांनी सांगितले. कोकणातील मुस्लिम मराठी माणसांनी मतदानाचा उच्चांक प्रस्थापित करा आणि यावेळी अनंत गीते यांच्या मशालीचे बटन असे दाबा की पुन्हा या पवित्र रायगड भूमीत कोणामध्येही गद्दारीची हिंमत निर्माण होणार नाही.