एकाला जळगावातून, तर दुसऱ्याला अहिल्यानगरमधून अटक
| पनवेल | प्रतिनिधी |
नाकाबंदीदरम्यान कार थांबविण्याचा इशारा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटवरून सुमारे 200 मीटरपर्यंत फरफटत नेल्याच्या गंभीर घटनेतील दोन्ही आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोहम कुमावत (22) आणि सोजल तायडे (23) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी एकाला जळगावातून, तर दुसऱ्याला अहिल्यानगरमधून ताब्यात घेतले.
कळंबोलीतील रोडपाली परिसरातील डी-मार्ट चौकात रात्रीच्या वेळी पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने कार थांबविण्याऐवजी वेगाने पुढे नेली. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई दिलीप भोई (43) यांना कारची धडक बसली. ते कारच्या बोनेटवर पडले असतानाही चालकाने वाहन न थांबवता त्यांना फरफटत नेले.
सुमारे 200 मीटर अंतर गेल्यानंतर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने भोई रस्त्यावर फेकले गेले. या घटनेत त्यांच्या उजव्या पायाच्या टाचेला फ्रॅक्चर झाले असून, इतर दुखापतीही झाल्या आहेत. घटनेनंतर कारमधील दोन्ही तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अटक केली. संबंधित कारवर बनावट क्रमांकपट्टी लावण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाची गंभीर दखल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतली. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. नाकाबंदीत पोलिसांवरच वाहन घालण्याच्या या प्रकारामुळे कळंबोली परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
