मास्टर डिग्री मिळावीत फडकविला तिरंगा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील बीड गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने गोऱ्यांच्या देशात मायक्रो बायोलॉजिमध्ये मास्टर डिग्री मिळवीत अभिमानाने तिरंगा फडकावला. कर्जत येथे गाड्या दुरुस्त करणारे गॅरेज मॅकेनिकने आपल्या मुलासाठी घर चालविण्याचा प्रश्न बाजूला ठेवून मुलाला शिक्षित करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होऊ शकते.
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बीड गावातील दीपक लोभी हे कर्जत येथे आमराई भागात लहानशे गॅरेज चालवतात. दुचाकींची दुरुस्ती करण्याचे काम करून पुन्हा 9 किलोमीटर अंतरावरील बीड गावी पोहोचतात. दीपक लोभी आणि त्यांच्या पत्नी ज्योती यांना दोन मुले असून, बीड गावात चांगली शैक्षणिक सुविधा नसल्याने दीपक लोभी हे घरातून निघताना आपल्या मुलांना कर्जत येथे घेऊन यायचे. त्यांचा मोठा मुलगा दर्शन हा बालवाडीपासून कर्जत तेथे शिक्षण घेत होता. शिशु मंदिरमध्ये चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यावर त्या शिशु मंदिर शाळेच्या समोर असलेल्या अभिनव प्रशाला येथे दर्शनने पाचवीपासून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. दीपक लोभी दररोज सकाळी आपल्या मुलांना कर्जत येथे घेऊन यायचे आणि नंतर सायंकाळी सात वाजता त्यांना बीड येथे आपल्या गावी घेऊन जायचे. त्यामुळे दीपक लोभी यांच्या दोन्ही मुलांचा बीड गावात दिसणे फार कमी असायचे. दहावीमध्ये 83 टक्के आणि बारावीमध्ये विज्ञान शाखेत 78 टक्के गुण मिळवून बीएस्सी करण्यासाठी दर्शनने उल्हासनगर येथील सीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 2018 मध्ये बॉयलॉजीमध्ये बीएस्सी होऊन पदवी प्राप्त केली.
मध्यमवर्गीय असलेले दीपक लोभी हे गॅरेज चालवून दोन्ही मुलांच्या उच्च शिक्षणाचा भार वाहू शकत नाही हे सत्य असले तरी मुलांची शिकायची इच्छा आणि आई वडिलांचा पाठिंबा यामुळे दर्शन लोभी याने बीएस्सी झाल्यावर त्याच महाविद्यालयात एमएस्सी हे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. 2020 मध्ये मायक्रो बायलॉजीची पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मात्र, आपल्याला देशाबाहेर जाऊन स्पेशलायझन करण्यासाठी जाण्याची इच्छा दर्शन लोभीने आपल्या वडिलांकडे व्यक्त केली. मात्र, इंग्लंडसारख्या गोऱ्यांच्या देशात जाऊन मायक्रो बायोलॉजीमधील मॅक्यूलस बायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाची शिक्षण घेण्याची प्रगल्भ इच्छा यामुळे दीपक लोभी यांनी आपल्या मित्रांकडून आर्थिक सहकार्य मिळविले आणि 2020 मध्ये मुलाला इंग्लंड येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड मधील नोटींगहॅम सिटी मधील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असलेल्या नोटींगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. तेथे निवासी शिक्षण घेत दर्शनने जुलै 2023 मध्ये मायक्रो बायोलॉजीमधील मॅक्यूलस बायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशनचे शिक्षण पूर्ण केले.