| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरातील कचरा नगरपंचायतीच्या मालकीच्या तळा घरणाजवळ टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी संरक्षक भिंत नसल्यामुळे तो कचरा सर्वत्र पसरला जात आहे. त्याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील डंपिंग ग्राऊंड दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही याच ठिकाणी कचरा टकला जात आहे. त्यामुळे या डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर कधी होणार, असा प्रश्न आता शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
तळा नगरपंचायतीने डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था मालकीच्या तळा धरणाजवळ केली आहे. शहरातील सर्व गोळा केलेला ओला व सुका कचरा एकत्रित या ठिकाणी टाकला जातो. मात्र, या डम्पिंग ग्राऊंड सभोवती संरक्षक भिंत न बांधल्यामुळे मोकाट गुरे, कुत्रे व पक्षांनी तो पसरला जात आहे. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. जवळच तहसिल कार्यालय असल्याने याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच, डम्पिंग ग्राऊंड शेजारीच निम्म्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल मारण्यात आली आहे. डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेला हा कचरा कुजून जमिनीद्वारे पाण्यात मुरले जात आहे. त्यामुळे याचा परिणाम मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर शहरातील आंबेळी येथे नगरपंचायतीच्या मालकी हक्क असलेल्या जागेत होणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगितले गेले होते. त्यानुसार त्या ठिकाणी काम ही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी डम्पिंगला ग्रामस्थांच्या असलेल्या विरोधामुळे अद्यापही धरणा शेजारीच शहरातील कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे तळा शहरातील कचऱ्याची समस्या बिकट होत चालली असून उन्हाळी हा कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे.