माणगावात जांभरे कुटुंबियांची 32 वर्षांची परंपरा, विविध जातीच्या कलिंगडाचे विक्रमी उत्पादन; लाखो रुपयांची उलाढाल
| माणगाव | सलीम शेख |
माणगाव तालुक्यातील रेपोली गावचे रहिवासी असलेले प्रगतशील शेतकरी तथा जिल्हा परिषदेचे रायगडभूषण पुरस्कारप्राप्त सुनील केरू जांभरे यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर 45 एकरांमध्ये कलिंगडाचा मळा फुलवला आहे. दरवर्षी ते विविध जातीच्या कलिंगडांचे विक्रमी उत्पादन घेतात. लाखो रुपयांची उलाढाल करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवून त्यांनी आपली प्रगती साधली आहे. जांभरे कुटुंबियांची कलिंगड लागवडीची ही 32 वर्षांची परंपरा आहे.
शेतकरी सुनील जांभरे यांच्या वडिलांपासून हा कलिंगडाचा व्यवसाय सुरु असून, त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी या कलिंगड लागवड व्यवसायात झोकून देऊन काम केले आहे. सुनील जांभरे यांचे शिक्षण सातवीपर्यंत तालुक्यातील जे.बी. सावंत हायस्कूल, लोणेरे येथे झाले असून, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांचा मुलगा सुजितने पदवीधर अँग्रीकल्चर डिप्लोमा कोर्स केला आहे. 32 वर्षांपूर्वी सुनील जांभरे यांचे वडील सुरुवातीला एक ते दोन एकरमध्ये कलिंगड फळाची लागवड करीत होते. त्यावेळी कलिंगडाचे बियाणे 700 रुपये किलो होते. तर, आता त्याच कलिंगड बियाणांचे भाव 14 ते 16 हजार रुपये किलो आहे. सुरुवातीला टनाचा भाव 2800 रुपये इतका होता तर आता टनाचा भाव 10 हजार रुपये एवढा आहे. सुनील जांभरे यांनी अगोदर काही वर्ष माणगाव येथील अनिसा चिकन सेंटरमध्ये रोजंदारीवर काम केले. त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेती व्यवसायाकडे लक्ष देऊन परंपरागत कलिंगड लागवडीचा व्यवसाय पुढे सुरु ठेवण्याचा मानस करून त्यामध्ये ते कमालीचे यशस्वी झाले.
सुनील जांभरे यांनी 50 ते 60 एकरामध्ये ही कलिंगड व्यवसायाची लागवड करून गेल्या वर्षी सुप्रित जातीचा 17 किलो वजनाचा कलिंगडाचा फळ त्यांच्या शेतामध्ये आला होता. यावर्षी सुनील जांभरे व कुटुंबियांनी मोर्बा भागात 35 एकरांत व होडगाव गावच्या हद्दीत 10 एकरात मिळून सुमारे 45 एकरमध्ये कलिंगडाची लागवड केली आहे. याकरिता त्यांनी सांगली येथून साधारण 20 दिवसांचे गोल्डन, आयशा, ब्लॅक किंग, जिग्ना गोल्ड, सुप्रित, आगस्टा अशा विविध जातीच्या लाल भडक चवदार कलिंगडाचे 2 लाख रोपटे आणून ही रोपटे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला लावून कलिंगडाचा मळा जवळच्या नदीतील व क्रेशरच्या खाणीत साचलेला पाणी पंपाद्वारे ओढून चांगल्या प्रकारे त्यांच्या कुटुंबियांनी व 10 मजुरांनी दिवस-रात्र अथक परिश्रम घेत फुलवून चांगल्या प्रकारे फळे आली आहेत. त्यांच्या कलिंगडाचे हे पीक दरवर्षी माणगाव बाजारपेठेत सर्वात अगोदर दाखल होत असते. त्यांचे हे कलिंगड विक्रीसाठी ठाणे, वाशी, मुंबई, पुणे, फलटण, सांगली बाजारपेठेत जाते. 45 एकरात कलिंगड फळाची लागवड करताना जवळपास 30 लाख रुपये इतका खर्च येऊन 30 लाख रुपये उत्पन्न आम्हाला तीन महिन्याच्या अंतरात मिळत असल्याचे शेतकरी सुनील जांभरे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.
आज अनेक तरुण-तरुणी पदवीचे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. अनेकजण 4 ते 5 हजार रुपयांच्या पगारात मिळेल ते काम करताना दिसत आहेत. त्यांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा अशा प्रकारच्या शेती व्यवसायाकडे लक्ष दिल्यास त्यांचा निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
सुनील जांभरे, शेतकरी